Wednesday, August 1, 2012

विकीपीडियाची दशकपूर्ती

सर्वसामान्यांपासून अतिहुशार अशा सर्व जनतेच्या ज्ञानात भर घालणार्‍या विकीपीडियाला अस्तित्वात येऊन दहा वर्षे झाली असली, तरी आजही जगात सर्वाधिक पाहिल्या जाणार्‍या १० वेबसाईटमध्ये तिचे स्थान अबाधित राहिले आहे. फेसबुक आणि ट्टिटरसारख्या युजर फ्रेंडली साईटच्या स्पर्धेतही विकीपीडिया स्वत:चे स्थान टिकविण्यात यशस्वी ठरली आहे.
वॉशिंग्टन येथे गेल्याच आठवड्यात विकीपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विकीमॅनिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अक्षरशः हजारो लोक उपस्थित होते. २००१ पासून सुरू असलेल्या या वेबसाईटविषयी सर्वच सदस्य मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त करत होते. वेबसाईटसाठी दहा वर्षे हा कालावधी मोठा आहे. त्यामुळे आता या साईटने बदलायला हवे. नवे स्वरूप घ्यायला हवे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. दहा वर्षांत बदल झाला नाही, मात्र आता साईट अपग्रेड करायला हवी असे सदस्यांचे मत होते.
साईटचा संस्थापक जिमी वेल्स यानेही विकीपीडियाचे बॉस आम्ही नाही तर विकीपीडियाचे सर्व सदस्य आहेत, असे सांगितले. तो म्हणाला की, एक विशिष्ट ध्येयाने आपण एकत्र आलो आहोत आणि आम्ही आपण सर्व एक कम्युनिटी आहोत, हाच दृष्टिकोन ठेवला आहे. साईटमध्ये बदल करायचा का, कसा करायचा, याचा विचारही आपण सर्वांनी मिळूनच करायचा आहे.
यासबा, स्वाहिली आणि आफ्रिकनसह २८५ भाषांत असलेल्या या साईटवर २२ दशलक्ष आर्टिकल्स आहेत. १ लाखांपेक्षा अधिक लोक या साईटचे कॉन्ट्रिब्युटर आहेत. मात्र नवीन जॉईन होणार्‍यांसाठी ती अधिक सुलभ, सोपी हवी असे अनेकांचे मत आहे. या साईटवर कुणीही माहितीत भर टाकू शकतो, संपादन करू शकतो मात्र ती एकूण प्रोसेस बरीच किचकट आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे. असे असले तरी आपल्या चुका प्रामाणिकपणे कबूल करण्याचे धैर्य साईटने नेहमीच दाखविले असल्याने या ज्ञानकोशावरचा लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, हेही तितकेच खरे.
[वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

29 July 12 City












Monday, June 25, 2012

पंतप्रधान हिंदुत्ववादी का नको?

सरसंघचालक मोहनजी भागवत
नितीशकुमारांची भूमिका स्वार्थापोटी : भागवत
लातूर (जि.प्र.) - पंतप्रधानपदाचा उमेदवार पंथनिरपेक्ष असावा ही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भूमिका राजकीय स्वार्थापोटी असून, पंतप्रधानपदाचा उमेदवार हिंदुत्ववादी का नको ? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी उपस्थित केला.
लातूर येथे बुधवारी सकाळी ७ वाजता स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या बौध्दिक वर्गात भागवत बोलत होते. व्यासपीठावर क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोक कुकडे, महानगर संघचालक बालाप्रसाद बाहेती उपस्थित होते.
नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसंबंधी पंथनिरपेक्षतेचा आग्रह धरला, तो निवडणुकीत आपली मते कमी होतील या संकुचित स्वार्थासाठीे. आपण हिंदू आहोत हे काही मंडळी खाजगीत मान्य करतात, हिंदुत्वाचा विचार मान्य करतात मात्र सार्वजनिकरीत्या भूमिका सांगायला त्यांना लाज वाटते. पंतप्रधानपदाचा उमेदवार हिंदुत्ववादी का नको ? असा सवालही भागवत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, हिंदुत्वाचा मार्ग हा शाश्‍वत मार्ग आहे. संघाचे काम हे हिंदू संघटन करण्याचे आहे. विविधता अन् परिवर्तनशीलता हा परिस्थितीचा नियम आहे. समस्यांच्या ऐवजी उपायांचे चिंतन करायला हवे. सध्या समाजात विश्‍वास हरवत चालला आहे, तेव्हा कोणावर विश्‍वास टाकावा, याचे उत्तर शोधले पाहिजे. जे काही करेल ते परमेश्‍वर व परमेश्‍वराने काही केले नाही तर सरकार करेल, अशी समाजाची अपेक्षा असते. तुम्ही जर हातपाय हलवले नाही तर देवही तुमच्या मदतीला येत नाही. तुम्ही काही करणार असाल तरच देव मदतीला येतो. आपण मंडळी तर साधे मतदानाचेही कर्तव्य बजावत नाहीत. जागे रहात नाहीत. देशाची परिस्थिती बिघडली म्हणून केवळ आकाशाकडे डोळे लावून बसण्यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी नजरेचा चाबूक सतत जागरूक ठेवला पाहिजे.  समाज परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन शक्य नाही. आपल्यासाठी भारत देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, ती केवळ आपल्या देहाचे पोषण करत नाही तर मन व बुध्दीही घडवत असते. संपूर्ण जगातील सुसंस्कृत संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिले जाते. हिंदू संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. ‘हम भी सही और तुम भी सही’ ही हिंदुत्वाची भूमिका आहे. आमचेच तेवढे खरे असे ती मानत नाही. हिंदूशास्त्र म्हणजे मानवशास्त्र आहे व त्यात वैश्‍विक विचार दडलेला आहे, असेही ते म्हणाले. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढणार नाही

नवी दिल्ली, (हिं.स.) - तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, भाजपा-रालोआ आणि इतरही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. परंतु आपली सद्सद्विवेकबुद्धी ही निवडणूक लढविण्यापासून आपल्याला परावृत्त करीत आहे. तेव्हा आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकऱण माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिले आहे. डॉ. कलाम यांच्या नकारामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांची दावेदारी आणखी प्रबळ झाली आहे. 
पुढील महिन्यात होणार्‍या नव्या राष्ट्रपतीच्या निवडीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी गेले काही दिवस जोरदार तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.ए.संगमा यांनी सर्वप्रथम या पदासाठी निवडणूक लढविण्याकरिता आपली उमेदवारी जाहीर केली. संगमा यांना ओडिशातील सत्ताधारी बीजू जनता दल, तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांना इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली.
त्यानंतर बराच खल करून अखेरीस कॉंँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची घोषणा केली. दरम्यान प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुखर्जी यांना आपला विरोध असल्याचे सांगत माजी राष्ट्रपती आणि ..भारताचे मिसाईल मॅन.. अशी ओळख असलेल्या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आपला पाठिंबा जाहीर केला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य काही पक्षांनाही हा पर्याय पुर्वीपासूनच पसंत असल्याने डॉ.कलाम यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्न गेले काही दिवस सुरू होता.
तथापि सोमवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याशी चर्चा करून कलाम यांनी त्यांना आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होऊ इच्छित नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट कऱणारे प्रसिद्धीपत्रकही त्यांनी जारी केले.
पी.ए.संगमा यांनी मात्र आपल्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संगमा यांना जाहीरपणे विरोध केला आहे. संगमा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, याकरिता पवारांनी खास आपल्या शैलीने इतर पक्षांमार्फत संगमांवर दबाव वाढविण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी या घडामोडींनंतर काय पावले उचलणार याकडे  राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 
अडवाणींची डॉ. कलाम यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज(सोमवार)माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेस पक्षाने एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. कलाम यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा असल्याचे समजते. परंतु, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे कलाम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी आज सकाळी लालकृष्ण अडवानी यांनी कलाम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधिंद्र कुलकर्णी यांनी आज दोन वेळा कलाम यांची भेट घेतली. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

नवी मुंबई : वाशी टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. मनसेचे आमदार बाळा नांदगांवकर यांच्यासमोर मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.
टोल नाक्यावर वाहनांची नोंदणी करण्यासाठी कुणी बसायचं, यावरून वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. टोल नाक्यांवर प्रमाणापेक्षा अधिक वसुली वाहन चालकांकडून होत असल्याच्या संशयावरून, मनसेने राज्यातील टोल नाक्यांवर मनसेचा पहारा आहे. मनसे पुढील पंधरा दिवस हा पहारा ठेवणार आहे. मनसेकडून वाहनं मोजली जाणार आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी मनसेकडून ठेवली जात आहे. पंधरा दिवसांच्या वाहनांची सरासरी काढल्यानंतर टोलमध्ये नेमका काय झोल आहे, हे समोर येणार आहे. म्हणून मनसेकडून वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे.
टोल नाक्यावरील वाहनांच्या नोंदीचा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे.

कोकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने

रत्नागिरी: मान्सून सक्रिय होताच पहिला फटका कोकण रेल्वेच्या प्रवाशांना बसलाय. आडवलीजवळ रुळावर आलेले दगड आणि मातीचे ढिगारे आता बाजूला करण्यात आलेत. खोळंबलेल्या सहा गाड्या वेगवेगळ्या स्थानकांतून पुढे सरकू लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे.
 गेल्या ३६ तासांपासून  कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा आणि आडवली स्टेशना दरम्यान मातीचे ढिग रुळावर वाहून आले त्यामुळे गेल्या पाच तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प  होती.

रायगडमध्ये भरला होड्यांचा मेळा

रायगड: पावसाळ्याला सुरुवात होताच रायगडच्या किनाऱ्यांवर होड्यांचा मेळावा भरलेला दिसत आहे. रायगडमधील मच्छिमारही मासेमारीसाठी आता नारळी पौर्णिमेकड़े डोळे लावून बसले आहेत.
किनारपट्टीवर मोठ्या ऐटीत उभ्या असलेल्या हजारो होड्यांना खळखळणारा समुद्र जणू आव्हानच देत आहे.
पावसाळ्यात मच्छिमाऱ्यांना मासेमारी करण्यास बंदी असते. दरम्यान याच कालावधीत अनेक मासे प्रजनन करतात. त्यामुळे हा कालावधी माशांना पोषक असतो. म्हणूनच पुढची दोन महिने तरी होड्या किनाऱ्यावर नांगरलेल्या दिसतील.
काही मच्छीमार आपल्या होड्यांची डागडुजी करताना तर काहीजण आपआपल्या होड्यांमध्ये सुस्तावलेले दिसतायेत.
यामुळे ह्या किनाऱ्यांवर विलोभनीय असे चित्र तयार होत असून यामुळे या किनाऱ्यांवर होड्यांचा मेळावा भरला असल्याचा आभास होतोय.