Monday, June 25, 2012

पंतप्रधान हिंदुत्ववादी का नको?

सरसंघचालक मोहनजी भागवत
नितीशकुमारांची भूमिका स्वार्थापोटी : भागवत
लातूर (जि.प्र.) - पंतप्रधानपदाचा उमेदवार पंथनिरपेक्ष असावा ही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भूमिका राजकीय स्वार्थापोटी असून, पंतप्रधानपदाचा उमेदवार हिंदुत्ववादी का नको ? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी उपस्थित केला.
लातूर येथे बुधवारी सकाळी ७ वाजता स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या बौध्दिक वर्गात भागवत बोलत होते. व्यासपीठावर क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोक कुकडे, महानगर संघचालक बालाप्रसाद बाहेती उपस्थित होते.
नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसंबंधी पंथनिरपेक्षतेचा आग्रह धरला, तो निवडणुकीत आपली मते कमी होतील या संकुचित स्वार्थासाठीे. आपण हिंदू आहोत हे काही मंडळी खाजगीत मान्य करतात, हिंदुत्वाचा विचार मान्य करतात मात्र सार्वजनिकरीत्या भूमिका सांगायला त्यांना लाज वाटते. पंतप्रधानपदाचा उमेदवार हिंदुत्ववादी का नको ? असा सवालही भागवत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, हिंदुत्वाचा मार्ग हा शाश्‍वत मार्ग आहे. संघाचे काम हे हिंदू संघटन करण्याचे आहे. विविधता अन् परिवर्तनशीलता हा परिस्थितीचा नियम आहे. समस्यांच्या ऐवजी उपायांचे चिंतन करायला हवे. सध्या समाजात विश्‍वास हरवत चालला आहे, तेव्हा कोणावर विश्‍वास टाकावा, याचे उत्तर शोधले पाहिजे. जे काही करेल ते परमेश्‍वर व परमेश्‍वराने काही केले नाही तर सरकार करेल, अशी समाजाची अपेक्षा असते. तुम्ही जर हातपाय हलवले नाही तर देवही तुमच्या मदतीला येत नाही. तुम्ही काही करणार असाल तरच देव मदतीला येतो. आपण मंडळी तर साधे मतदानाचेही कर्तव्य बजावत नाहीत. जागे रहात नाहीत. देशाची परिस्थिती बिघडली म्हणून केवळ आकाशाकडे डोळे लावून बसण्यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी नजरेचा चाबूक सतत जागरूक ठेवला पाहिजे.  समाज परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन शक्य नाही. आपल्यासाठी भारत देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, ती केवळ आपल्या देहाचे पोषण करत नाही तर मन व बुध्दीही घडवत असते. संपूर्ण जगातील सुसंस्कृत संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिले जाते. हिंदू संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. ‘हम भी सही और तुम भी सही’ ही हिंदुत्वाची भूमिका आहे. आमचेच तेवढे खरे असे ती मानत नाही. हिंदूशास्त्र म्हणजे मानवशास्त्र आहे व त्यात वैश्‍विक विचार दडलेला आहे, असेही ते म्हणाले. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

1 comment: