Wednesday, June 6, 2012

कॉंग्रेसच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीचा दे धक्का!

सोलापूर, दि. १ जून (हिं. स.) - परांडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर कुरघोडी करत आपला राजकीय डाव यशस्वी केला. यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीकडून जोरदार धक्का दिला गेला असला तरी, पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली जनता तहानलेलीच आहे. त्यामुळे आता जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वरुणराजालाच साकडे घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर; तसेच अक्कलकोट तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे म्हणून माजी आ. आनंदराव देवकते यांनी गेल्या काही वर्षापूर्वी आंदोलन उभे केले होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाला यश आले होते. मात्र यावेळी कॉंग्रेसचे नेतृत्व सीना-कोळेगाव धरणाच्या राजकीय प्रवाहात वाहून गेले आहे.

दक्षिण तालुका, उत्तर तालुका तसेच अक्कलकोट तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सीना नदीत पाणी सोडावे अशी मागणी आ. दिलीप माने यांनी केली. पाणी त्वरीत सोडावे यासाठी लोकशाहिदिनी त्यांनी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी यांच्यासह पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना नजरकैदेत ठेवले. त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी परांडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेेश दिले. एका कॉंग्रेसच्या आमदाराची मागणी कशी मान्य करायची म्हणून मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या खासदारांसह आमदारांनी देखील यास कडाडून विरोध दर्शवत आंदोलन उभे केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय २४ तासाच्या आत फिरवत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. राष्ट्रवादीचा या ठिकाणी पहिला डाव यशस्वी झाला. परंतु मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करुन दिल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा आपल्याच निर्णयाला स्थगिती देत पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे राष्ट्रवादी हतबल झाली. आणि नवा राजकीय डाव आखण्यास राष्ट्रवादीने सुरवात केली.

रविवार, २७ मे रोजी सीना-कोळेगाव प्रकल्पातून १५०० क्युसेक्स पाण्याच्या विसर्गाला सुरवात झाली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाणी कमी होईल या भीतीने पाटबंधारे खात्यास पाण्याच्या विसर्गात ३०० क्युसेक्सने कपात करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे पाण्याची गती मंदावली. कृषीमंत्री शरद पवार यांच्या मतदार संघात पाणी येईपयर्र्ंत खा. पद्मसिंह पाटील गप्प राहिले. पाणी माढा तालुका पार करण्यापूर्वी खा. पद्मसिंहांनी आपला डाव टाकला. माढा तालुक्यातील मुंगशी गावातील शेतकर्‍यांना मॅनेज केले गेले. पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास वीज चालू ठेवण्यात आली. त्याच वेळेस खा. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंगशी गावातील नदीकाठ गाठला. ठरल्याप्रमाणे शेतकर्‍यांनी यावेळी आपल्या विजेच्या मोटारी चालू ठेवल्या.

खासदारांनी आपल्यासोबत आणलेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना वीजपंप सुरु असल्याचे थेट प्रक्षेपण दाखवायला लावले आणि मुख्यमंत्र्यांना हे थेट चित्रीकरण पाहण्यास सांगितले. विशेष म्हणजे धाराशिवचे कार्यतत्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनीदेखील प्रोटोकॉल मोडत थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि ‘सर, पानी छोडना अभी बंद करे, या कल करु ? असे अगदी अदबीने विचारले. यावेळी तहसीलदारांसह इतर अधिकारी उपस्थित असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी गेडाम यांनी स्वत: पंचनामा लिहिला. कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या पद्मसिंहांना सध्या तरी यश आले आहे. परंतु दक्षिण, उत्तर तसेच अक्कलकोट तालुक्यातील पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या जनतेला कुरघोडीच्या राजकारणापेक्षा पाण्याची खरी गरज आहे. पाणी कधी मिळणार हा या भागातील जनतेपुढील लाखमोलाचा प्रश्‍न आहे.
हिन्दुस्थान समाचार / १.०६.२०१२ / अमर पुराणिक / चैताली गुरव / मिनल माळी

No comments:

Post a Comment