Monday, June 4, 2012

धमदीटोल्यात पोलिस-नक्षल चकमक

गोंदिया,(तभा वृत्तसेवा) : देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत धमदीटोला-पिंडकेपार जंगल परिसरात काही नक्षली असल्याची माहिती गोंदियाच्या सी-६० पथकाला मिळाली.या महितीच्या आधारे पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबविले.
 दरम्यान, पिंडकेपारच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.पोलिसांनीही प्रत्त्युतरात गोळीबार केला असता नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून नक्षली साहित्य जप्त केले आहे. ही घटना रविवार, ३ जून रोजी देवरी तालुक्यातील धमदीटोला-पिंडकेपार येथील जंगल परिसरात घडली.
 नक्षल्यांनी देवरी तालुक्यातील पिंडकेपार-धमदीटोला जंगल परिसरात काही शस्त्रधारी नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या सी-६० पथकाने नक्षल शोध मोहीम राबवून नक्षल्यांचे शिबिर उद्‌ध्वस्त केले.
 या कारवाईत ३ पिट्टू, नक्षली पत्रके, तांदूळ व जेवण बनविण्याचे साहित्य, पाण्याचे ७ ते ८ कॅन, दैनंदिन वापरातील महिला व पुरुषांचे कपडे व वस्तू, औषधी साहित्य, औषधी पेटी, जोडे-चप्पल इत्यादी साहित्य जप्त केले आहे.
 नक्षल्यांचे हे सर्व साहित्य पुढील तपासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.जप्त केलेले साहित्य व घटनास्थळावरील परिस्थितीवरून नक्षल्यांनी पिंडकेपार येथे शिबिर लावल्याचा कयासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 पोलिसांनी नक्षल्यांचे हे महत्त्वपूर्ण शिबिर उद्‌ध्वस्त केल्याने नक्षल्यांद्वारे गोंदिया जिल्ह्यातील घातपाताच्या उद्देशाला पायबंद बसला आहे. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० पथकाने नक्षल शोधमोहीम अभियान राबवत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment