Monday, June 4, 2012

समन्वयाच्या अभावामुळे श्रोतृगृहाची दुर्दशा

यवतमाळ,(तभा वृत्तसेवा) : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या दिमाखाने, डौलदारपणे श्रोतृगृहाची इमारत उभी आहे. ७०० प्रेक्षक आरामात बसून, कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील, अशा पद्धतीने हे सभागृह बांधण्यात आले आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी २ कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करून बांधलेल्या या सभागृहाची आजमितीस अतिशय दुर्दशा झाली आहे.

 या बांधकामाचा खर्च संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आणि त्यानंतर हे सभागृह वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात आले.तेव्हा या सभागृहाची देखभाल वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने करावी,असे अपेक्षित होते. परंतु तसे न होता या सभागृहाची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच ठेवण्यात आली.

 वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर आणि सोबतच हे श्रोतृगृह याची देखभाल करण्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांची आवश्यकता असताना येथे मात्र देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी एक छदामही खर्च केल्या जात नाही. परिणामी या श्रोतृगृहाची इतकी दुरावस्था झाली आहे की, सभागृहामधील आरामखुर्च्यांची ‘पुशबॅक’ यंत्रणा जवळजवळ निकामी झाली आहे. ही यंत्रणा निकामी होण्यासाठी दिवसाढवळ्या चोरट्यांनीच हातभार लावला आहे.

 या सभागृहातील पंखे एकतर बंद आहेत किंवा चोरीलाच गेले आहेत. सभागृह परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.सभागृहामध्ये दारूच्या बाटल्या सर्रासपणे आढळून येतात.स्नानगृह व शौचालय यांची अवस्थाही क्षीण झाली आहे.या सभागृहासोबतच मेडिकल कॉलेजचा परिसरही देखभालीअभावी घाणेरडा झाला आहे.

 या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या जबाबदार सूत्रांशी संवाद साधला असता त्यांनी या सर्व बाबींना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असे म्हटले आहे.

 या परिसराच्या देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक उपविभागीय अभियंता व त्याचे अधिकारी शासनाने नियुक्त केले असताना केवळ बेजबाबदारपणामुळे आमचे हाल होत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला. त्यांच्या म्हणण्यानुसार या श्रोतृगृहाचे भाडे शासनाने १० हजार रुपये एकावेळेसचे ठरवले असले तरी आम्ही मात्र फक्त ६ हजार रुपयेच घेतो. परंतु हे ६ हजार रुपये आमच्या कामी न येता सरळ सरकारी तिजोरीत जमा होतात. त्यामुळे सभागृहाच्या दुरुस्तीसाठी आमच्याजवळ निधी उपलब्ध नसतो.

 या श्रोतृगृहासाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे किती निधी येतो व किती खर्च करतात हे त्यांनाच माहीत.एवढे मात्र निश्‍चित वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. त्यामुळेच या परिसराची दुर्दशा झाली आहे. यवतमाळ शहरात सध्यातरी अस्तित्वात असलेले हे एकमेव श्रोतृगृह अद्यावत असावे, तिथे नेहमीसाठी चौकीदार असावा, पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था असावी.एवढी माफक अपेक्षासुद्धा या दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे नागरिक तसेच नाट्य कलावंत,नाट्यरसिक यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

 वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात असलेले हे सभागृह बीओटी तत्त्वावर खाजगी संस्थेस चालविण्यात यावे या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे खुद्द शासनानेच कळविले आहे आणि आम्ही हे शासनाने म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. त्यालाही तीन महिन्यांच्या वर कालावधी लोटला आहे. त्या प्रस्तावाचे काय झाले हेही सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहीत.

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष तिखिले यांच्याशी या संदर्भात बातचीत केली असता त्यांनी असमन्वय असल्याच्या इन्कार केला.वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर व श्रोतृृगृहासाठी देखभाल आणि दुरुस्तीकरिता वर्षभराचा ताळेबंद शासनाकडे पाठविला असून,शासनाकडे निधीची कमतरता असल्यामुळे आपण हतबल आहोत, असेही ते म्हणाले. शासनाकडून निधी येताच या त्रुटी दूर होतील आणि जनतेची नाराजीही दूर होईल,असेही तिखिले यांनी स्पष्ट केले.

 शासनाचा निधी केव्हा येईल माहीत नाही. परंतु या दोन विभागांतील अधिकार्‍यांच्या असमन्वयामुळेच या सभागृहाची बकाल अवस्था झाली आहे, एवढे मात्र निश्‍चित. हे सभागृह पुन्हा अद्ययावत करावे, सभागृहातील खुर्च्या व्यवस्थित कराव्यात, उन्हाळ्यात तरी थंडावा मिळावा, परिसरात स्वच्छता राहावी, नेहमीसाठी सभागृहात चौकीदार असावा एवढीच माफक अपेक्षा यवतमाळकर करीत आहेत.

No comments:

Post a Comment