Monday, June 4, 2012

हिंदुराष्ट्र स्थापनेसाठीच संघाची स्थापना

अमरावती, (तभा वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ३३८ वर्षांपूर्वी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य पुन्हा हिंदूराष्ट्राच्या रूपाने प्रस्थापित करण्यासाठीच डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. मात्र, हे राष्ट्र उभे करण्यासाठी तितकीच चारित्र्यवान पिढीही निर्माण व्हावी म्हणून आज संघाच्या शाखा देशभरात असा समाज घडविण्याचे कार्य करीत आहे,असे प्रतिपादन संघाचे पश्‍चिम व दक्षिण क्षेत्र धर्मजागरण प्रमुख शरद ढोले यांनी केले.

 स्थानिक समर्थ हायस्कूलमध्ये २० दिवस चाललेल्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध उद्योजक व भारतीय धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक प्रमोद चांदूरकर प्रमुख अतिथी म्हणून आणि विदर्भ प्रांत संघचालक दादाराव भडके, संघशिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी वासुदेवराव नळकांडे, जिल्हा संघचालक चंद्रशेखर भोंदू प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या समारोपप्रसंगी शिवराज्याभिषेकाचा ३३८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हिंदू साम्राज्यदिन उत्सव सुद्धा साजरा करण्यात आला.

 यावेळी बोलताना शरद ढोले म्हणाले की, ११९२ मध्ये हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि हजारो वर्षांची हिंदूंची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर हिंदूंचा प्रत्येक राजा हा इस्लामी सत्तेचा मांडलिक होता. तब्बल १६७४ पर्यंत हिंदू छत्र असणारा स्वतंत्र हिंदू राजा नव्हता. मात्र, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि हिंदुस्थानात पुन्हा हिंदूंची सत्ता प्रारंभ झाली. तेव्हापासून तो दिवस संघ हिंदू साम्राज्य उत्सव दिन म्हणून साजरा करतो. तानाजींसारखे पुत्राच्या लग्नाआधीच कोंढाण्याचे लग्न करणारे आणि समर्थ रामदासांसारखे स्वराज्याची प्रेरणा देणारे लोक त्यावेळी घडले म्हणूनच हिंदूंचे साम्राज्य पुर्नप्रस्थापित होऊ शकले.त्यानंतर अटकेपार झेंडे रोवले ते केवळ पेशव्यांनी. मात्र, त्याहीनंतरच्या काळात मूठभर इंग्रज आले व त्यांनी या देशाची सत्ता हस्तगत केली. केवळ जातीयवाद एकसंघता नसणे,अनिष्ट रूढी या अनेक गोष्टींमुळे हिंदुत्व पुन्हा संपुष्टात आले. डॉ. हेडगेवारांनी या सर्व उणिवांचा अभ्यास करून व त्यावर उपाय शोधून संघाची स्थापना केली. भारताला स्वतंत्र करून जगातील विविध देशांना सुद्धा पारतंत्र्यातून मुक्त करावे, हेच त्यांचे स्वप्न होते. तसा प्रस्तावही त्यावेळी त्यांनी मांडला होता. परंतु तो पारित करण्याची हिंमत त्यावेळच्या कॉंग्रेसमध्ये नव्हती.हिंदू म्हणून स्वतःला म्हणवून घेण्याची लाजही ज्या काळात सामान्य नागरिकाला वाटत होती, त्या काळात डॉ. हेडगेवार हे हिंदू राष्ट्र आहे, असे ठामपणे सांगत असत. छत्रपतींच्या हिंदूराष्ट्राची संकल्पना पुन्हा प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉक्टरांनी संघाची शाखा केली आणि आज देशभरात अडीच लाख गावात संघाच्या शाखा आहेत.१५ हजार स्वयंसेवक दरवर्षी प्रशिक्षणातून तयार होतात.अशा प्रकारे एक चारित्र्यसंपन्न पिढी तयार करून संपूर्ण राष्ट्रच हिंदूराष्ट्र म्हणून पुढे आणण्याचे स्वप्न संघाचे आहे, असे शरद ढोले शेवटी म्हणाले.

 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद चांदूरकर यांनी भारतातील हिंदू संस्कृतीचे, पुराणांचे अन्य देशात किती महत्त्व आहे हे दाखल्यासह बाली या बेटावरील उदाहरण देऊन पटवून दिले.आज या प्रशिक्षणातूनच आपण मोठे होणार आहोत.मात्र त्यासाठी प्रयत्न करा, विचाराची दिशा बदलवा, प्रवृत्ती बदलवा व मोठे व्हा, असा संदेश त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण व ध्वजप्रणाम झाल्यानंतर दंडक्रमिका, नियुद्ध, योगचाप, घोषवादन, ताडासन, अर्धकटीचक्रासन, विरभद्रासन,सूर्यनमस्कारआदि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण स्वयंसेवकांनी केले. सांघिक गीतानंतर प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. वासुदेवराव नळकांडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. ईश्वर गुंबळे यांनी वैयक्तिक गीत गायिले.तर संचालन आणि आभारप्रदर्शन जिल्हा कार्यवाह शिवा पिंपळकर यांनी केले.

दुग्ध शर्करा योग!

 संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचाही ३३८ वा दिन असल्याने संघाने ठरविल्यानुसार हा हिंदू साम्राज्य उत्सव दिन म्हणून पाळण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्या संस्थेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता त्या संस्थेचे नाव समर्थ शिक्षण संस्था असे आहे. समर्थ, शिवाजी आणि संघाचे काम हिंदूराष्ट्रासाठीच समर्पित असल्याने आजचा हा दुग्ध शर्करा योग असल्याचा उल्लेख मुख्य वक्ते शरद ढोले यांनी आपल्या भाषणातून केला.या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यभिषेकाची भव्य सिंहासनारूढ मूर्ती ठेवण्यात आली होती. ही मूर्ती सुद्धा आकर्षण ठरली होती. एकंदरीत प्रमुख वक्त्यांनी उल्लेख केल्या प्रमाणे आयोजकांनी सुद्धा दुग्ध शर्करा योग उत्कृृष्टपणे साधल्याचे दिसून येत होते.

No comments:

Post a Comment