Monday, June 11, 2012

काम केल्याने तिसर्‍यांदा निवडणुकीत यश : आ. देशमुख

उमरगा, - ग्रामीण भागातील परिवर्तनाचा विकास हेच ध्येय बाळगून कार्य केल्याने पुन्हा तिसर्‍यांदा निवडणुकीत यश मिळाले. राजकारण हे एक साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी समाजकार्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. हा माझा सत्कार नसून सर्वसामान्यांचा सत्कार असल्याचे मत नूतन विधानपरिषद सदस्य आ. दिलीपराव देशमुख यांनी कवठा येथे आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केले.
नूतन विधानपरिषद सदस्य आ. दिलीपराव देशमुख, जि. प. व पं. स. चे पदाधिकारी यांचा सत्कार व विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाले. अध्यक्षसथानी माजीमंत्री आ. बसवराज पाटील हे होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार वैजीनाथ शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील, जिल्हा कॉंग्रेसच कमिटीचे अप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष सादिकमियॉं काझी, राज्य फेडरेशनचे नूतन उपाध्यक्ष आबसाहेब पाटील, लातूर कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वयंप्रभा पाटील, माजी अध्यक्षा सुनिता आरळीकर, मांजरा कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख, बेलकुंड येथील संत शिरोमणी मारूती महाराज कारखान्याचे माजी चेअरमन श्रीपती काकडे, फेडरेशनचे चेअरमन सुग्रीव लोंढे, जागृती कारखान्याचे संचालक दिलीप माने, माजी चेअरमन रामदास पवार, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमर खानापुरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले की, लातूर व धाराशिव जिल्हा हा एकच आहे. या दोन जिल्ह्यांत केवळ नदी आहे. हा ऋणानुबंध असल्याने पहिलाच नागरी सत्कार होत आहे. लोकप्रतिनिधींनी विकासाची साखळी निर्माण करून कार्य करावे, पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तरच दुष्काळावर मात करता येईल. यासाठी जलकुंभ योजना प्रभावी ठरणार आहे. टँकरमुक्त गाव कसे होईल. त्यासाठी नियोजन हवे यासाठी इस्त्राईल व जपान या देशाकडून आदर्श आपण घेण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्याची ताकद या देशात आहे. बँका सक्षम झाल्या तरच शेतकर्‍यांची उन्नती होऊ शकेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेही तोट्यात होती. मात्र नंतरच्या काळात ही बँक अग्रेसर झाली, जिल्हा बँकही पुनर्वसनातून बाहेर काढण्यासाठी बापूराव पाटील यांनी चॅलेंज घेतले आहे. त्यामुळे लवकरच शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी अग्रेसर ठरणार आहे. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीयमंत्री ना. विलासराव देशमुख, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, माजीमंत्री आ. बसवराज पाटील यांच्या विचाराचा वारसा या भागाला मिळाल्याने विकासाला गती मिळाली. हा सत्कार तीन जिल्ह्यातील जनतेचा, मतदारांचा सत्कार आहे. आगामी काळातही या भागातील जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबध्द आहे.
पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण म्हणाले की, आ. देशमुख यांनी जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने चांगल्या पध्दतीने चालवून सर्वांना न्याय, दिशा, विचार देण्याचे काम केले म्हणून जनतेने तिसर्‍यांदा त्यांना विधानपरिषदेवर मतांनी निवडून दिल्याचे सांगितले. माजीमंत्री आ. बसवराज पाटील म्हणाले की, कारखाने, बँका, संस्था चांगल्या चालतात. त्या चांगल्या विचारामुळेच चालतात. त्यामुळे अनेक लोकांची उन्नती झालेली आहे. आ. दिलीपराव देशमुख यांनी विधीमंडळात चांगले काम केले असल्याचे सांगितले.  कार्यक्रमात आ. दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, औश्याचे नगराध्यक्ष संगमेश्‍वर ठेसे, निलंगा पं. स. सभापती नागनाथ पाटील, उपसभापती बालाजी कांबळे, लोहारा पं. स. सभापती आसिफ मुल्ला, उपसभापती सिद्रामप्पा दुलंगे, उमरगा पं. स. सभापती सौ. अक्षरबाई सोनवणे, उपसभापती माया काझी, मुरूमचे नगराध्यक्ष त्र्यंबकराव जाधव या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार सुभाष जेवळे तर आभार मलंग गुरूजी यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment