Saturday, June 23, 2012

काही मोड, काही खुर्दा!

 मोड आणि खुर्दा स्वरूपाच्या पक्षांना कसलेही तत्त्वज्ञान नाही, कसलाही राजकीय सिद्धांत नाही, कसलीही ठरावीक दिशा नाही. मात्र, या छोट्या छोट्या पक्षांची संख्याच इतकी मोठी आहे की त्यांनी देशाच्या राजकारणाचा समतोल बिघडवला आहे. काही घडविण्यापेक्षा बिघडवण्यावरच यांचा भर आहे. लोकसभेसाठी मतदान करताना राष्ट्रीय मुद्यांवर आधारित मतदान करणे कसे गरजेचे आहे याबाबत मतदारांमध्ये जागरूकता आणणे हाच यावरचा उपाय आहे. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे लांगूलचालन न करता राष्ट्रीय विषयांवर लोकचळवळ उभी करण्याची आणि त्या आधारे राष्ट्रीय मुद्यांवर लोकप्रबोधन करण्याची गरज आहे.

 भारतीय राजकारणाला सध्या लहान प्रादेशिक पक्षांनी ग्रासले आहे. संकुचित अस्मितांचा फायदा घेत उभे राहिलेले हे छोटे प्रादेशिक राजकीय पक्ष इतके दिवस राजकारणातील संख्यात्मक बेरजेवर आणि वजाबाकीवरच परिणाम करत होते, आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकत देशाच्या राजकारणाच्या घाटावर आपली वैचारिक धुणीही बाहेर काढण्याला सुरुवात केली आहे. हे धुणे फक्त दाखवायला वैचारिक धुणे आहे, पण प्रत्यक्षात यांचा अंतस्थ हेतू राजकीय दुकानदारीचाच आहे! कोणीही उठायचे आणि आपल्या शिंगांना धर्मनिरपेक्षता नावाचे बेगड लावले की आपण कोणालाही ढुसण्या द्यायला मोकळे, असे एक वातावरण या लोकांनी तयार केले आहे.या राजकीय पक्षांनी जरा आपले राजकीय अंतरंग आणि आपले चरित्र तपासून पाहण्याची गरज आहेसंपूर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम करतील आणि प्रभाव टाकतील असे दोनच राष्ट्रीय पक्ष या देशात आहेत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी! बाकी सगळी चिल्लर पार्टी आहे. अगदी जागतिक विचार घेऊन या देशात उभे राहिलेले साम्यवादी सुद्धा केरळ आणि पश्‍चिम बंगाल या दोनच राज्यांत तग धरून आहेत. बाकी देशात सर्वत्र ते डिपॉझिटला महाग! राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी चर्चेची घुसळण देशात चालली आहे,त्यामधून या चिल्लर पार्टीची अरेरावी फारच भडकपणे पुढे आली आहे. केंद्र सरकारला खिंडीत गाठून वाटमारी करू पाहणार्‍या ममताबाई काय, फायदा पाहून एका दिवसात सौदा करत टोपी फिरवणारे मुलायमसिंग काय, इतरांना गद्दार आणि लखोबा असे म्हणत हिणवणारे आणि ऐनवेळी खुसपट काढून एनडीएच्या परस्पर कॉंग्रेसला विनाकारण पाठिंबा देणारी शिवसेना काय किंवा हिंदू मतांची ऊब मिळवत सत्तेच्या गुबगुबीत सिंहासनावर बसून धर्मनिरपेक्षतेची प्रवचने झोडणारे नितीशकुमार काय, हे सगळे एका माळेचे मणी आहेत.ही निव्वळ सट्टेबाज किंवा सौदेबाजांची पिलावळ आहे. या लोकांना ना विचारसरणीची काही मर्यादा ना मतदारांशी यांची बांधीलकी! शिवसेनेचेच पहा. मराठी माणसांचा कैवार घेत लुंगीवाल्यांचा विरोध करत ही शिवसेना उभी राहिली. वसंत सेना असे लोकांनी हिणवण्याइतके यांनी एकेकाळी कॉंग्रेसमधील नेत्यांच्या इशार्‍यावर काम केले. हिंदुत्व विचारांचा परीसस्पर्श झाला. शिवसेना आणि भाजपा युती झाली. युती महाराष्ट्रात सत्तारूढ झाली. केंद्रातही अटलजींच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागाची संधी मिळाली. मात्र, या काळात वेळोवेळी यांनी मैत्रीधर्माची ऐशीतैशी करत किती वेळा तरी मनमानी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होती तेव्हा सगळा देश लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देत होता, तेव्हा शिवसेनेच्या मुखपत्रात गुडघे टेकविणार्‍यांना गुडघ्याचीच चिंता असे तत्त्वज्ञान सांगत बोरू झिजविले जात होते.कधी क्रिकेटच्या सामन्यावरून, तर कधी शस्त्रसंधीसारख्या निर्णयावरून ज्या सरकारात सहभागी त्या एनडीए सरकारवर दुगाण्या झाडल्या जात होत्या. गेल्या वेळी राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तर मराठी अस्मितेची आठवण झाली आणि मराठी उमेदवार म्हणून सगळी अस्मिता गुंडाळून ठेवून शिवसेनेने भगवे फेटे घालून कॉंग्रेसला ओळीने मतदान केले. आताही या निवडणुकीत हिंदुत्व, एनडीए सगळे विसरून काहीही कारण नसताना कॉंग्रेसच्या कळपात शिरून प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर करून टाकला आहे. एकेकाळी शिवसेना अभेद्य असताना भाजपापेक्षा यांची ताकद महाराष्ट्रात जास्त होती. मात्र, आता वारंवार शिवसेनेतून लोक बाहेर पडून शिवसेनेची कितीतरी शकले झाली आहेत. कधी भुजबळ, कधी नारायण राणे, कधी गणेश नाईक, तर कधी खुद्द राज ठाकरे! अशा स्थितीत महाराष्ट्रातील भाजपाने, शिवसेनेने काहीही भूमिका घेतली तरी मवाळपणा घेत अजून युती अभेद्य आहे, हे तुणतुणे किती दिवस वाजवायचे ते ठरविले पाहिजे.

 तिकडे बिहारमध्ये नितीशकुमार यांनी कालपर्यंत नव्हे, आजही भाजपासोबत युती करून राज्यात सत्ता मिळवली. सत्तेत भाजपा सहभागी आहे. उपमुख्यमंत्री म्हणून यांच्या मांडीला मांडी लावून सुशीलकुमार मोदी हे भाजपाचे नेते बसले आहेत. त्यांना आता अचानक धर्मनिरपेक्षतेची आठवण झाली आहे. लग्न करायचे, मुलांना जन्म द्यायचा, त्यांना मोठे करून त्यांचीही लग्ने करायची आणि वयाची साठ वर्षे उलटल्यावर अचानक जोडीदाराला त्याचे गोत्र काय असे विचारायचे, असा हा प्रकार आहे. प्रत्यक्ष राजकारण करताना भाषा, प्रान्त, जात यांच्या अस्मिता वापरून सामाजाला भडकवायचे, त्यांची गठ्ठा मते मिळवून राजकारण करायचे आणि राष्ट्रीय राजकारणात मात्र भाजपाला धर्मनिरपेक्षतेचे पाठ शिकवायचे, असला या लोकांचा धंदा आहे. ही मंडळी सोयीने राजकारण करतात, सोयीने सत्ताकारण करतात आणि सोयीने यांना धर्मनिरपेक्षतेची आठवण येते. लालूप्रसाद नकोत म्हणून नितीशकुमार, शरद यादवच काय थेट रामविलास पासवानही भाजपाबरोबर युती करणार, केंद्रात अटलजींच्या सरकारात मंत्री होऊन बंद गळ्याचा कोट घालून वावरणार आणि वारे फिरले की एका रात्रीत भाजपाला धर्मनिरपेक्षता शिकविण्याच्या भूमिकेत जाणार! रामविलास पासवान, द्रमुक, तेलगू देसम्, ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्स हे सगळे एनडीएच्या मांडवात सत्तेची ऊब घेऊन नंतर ढोंगी धर्मनिरपेक्षतेची प्रवचने देत हिंडणारे लोक आहेत. सोयीने बदलणारे सिद्धांत आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांसाठी धडपड हे यांच्या राजकारणाचे सूत्र आहे. वेळ पडेल तेव्हा, वेळ पडेल तसे या सूत्रासाठी हे लोक झटकन रंग, भाषा, चिन्ह, मित्र, शत्रू सर्वकाही बदलतात! मुळात कॉंग्रेस या राजकीय पक्षातही हेच सूत्र आहे. सोयीने बदलणारे सिद्धांत आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांसाठी काहीही करण्याची तयारी याच सूत्राभोवती कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते फिरत असतात. हे बरेचसे मोड आणि खुर्दा अशा स्वरूपाचे प्रादेशिक पक्ष नेत्यांनी आपापल्या स्वार्थासाठी कॉंग्रेसमधून बाहेर पडून निर्माण केलेले आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी अशी मोठी यादी आहे.

मोड आणि खुर्दा स्वरूपाच्या पक्षांना कसलेही तत्त्वज्ञान नाही, कसलाही राजकीय सिद्धांत नाही, कसलीही ठरावीक दिशा नाही. मात्र, या छोट्या छोट्या पक्षांची संख्याच इतकी मोठी आहे की त्यांनी देशाच्या राजकारणाचा समतोल बिघडवला आहे. काही घडविण्यापेक्षा बिघडवण्यावरच यांचा भर आहे. लोकसभेसाठी मतदान करताना राष्ट्रीय मुद्यांवर आधारित मतदान करणे कसे गरजेचे आहे याबाबत मतदारांमध्ये जागरूकता आणणे हाच यावरचा उपाय आहे. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे लांगूलचालन न करता राष्ट्रीय विषयांवर लोकचळवळ उभी करण्याची आणि त्या आधारे राष्ट्रीय मुद्यांवर लोकप्रबोधन करण्याची गरज आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासारख्या विषयावर राजकीय पक्षांपेक्षा अण्णा हजारे यांच्यासारख्या अराजकीय नेतृत्वाला पुढे यावे लागते, काळ्या पैशांच्या मुद्यावर रामदेवबाबांसारख्या व्यक्तीला काम करावे लागते. हे चित्र बदलले पाहिजे. राष्ट्रीय पक्षांनी राष्ट्रीय विषयांवर, राजकीय सिद्धांत, राजकीय शुचिता, राजकीय भूमिका याच्याशी निगडित विषय, राष्ट्रीय प्रश्‍न आणि समस्या घेऊन देशभर लोकचळवळी उभ्या करून जनतेचे प्रबोधन व मतनिश्‍चिती केली पाहिजे. राष्ट्रीय पक्ष हे करणार नाहीत तोपर्यंत प्रादेशिक पक्षांची लहर, अरेरावी, प्रवचने ऐकण्याची वेळ येतच राहणार आहे. रेल्वेचे अंदाजपत्रक मांडून चर्चा होईपर्यंत रेल्वेमंत्री बदलण्याची वेळ येणे काय किंवा पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार कोण असावा यासाठी आताच चर्चा उपस्थित होण्याची वेळ येणे काय, हे सर्व घडतच राहणार आहे. एकजन, एक राष्ट्र, एक विचार, एक लहर असे चित्र निर्माण होण्यासाठी व्यापक जनजागृतीचा हलकल्लोळ करावाच लागेल! [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

No comments:

Post a Comment