Saturday, June 23, 2012

ममतापूर्ण मुलायम गुगली !

 राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना भीक न घालता निर्धोकपणे सत्ताधारी आघाडी ठरवेल तो उमेदवार विजयी करून देशाच्या राजकारणावर आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या सोनिया गांधींच्या प्रयत्नांना ममतापूर्ण मुलायम गुगलीने चांगलीच खीळ बसली आहे. आघाड्यांच्या गोळाबेरीज राजकारणात आता भूमितीतील काटकोन, व्युत्क्रमकोन, पूरककोन, विरुद्धकोन असे सगळे कोन दिसू लागले आहेत. फक्त वैचारिक निष्ठेवर आधारित राजकीय दृष्टिकोन मात्र कुठे दिसेनासा झाला आहे. मुलायमसिंग यादव आणि कॉंग्रेस यांची खडाखडी तर अनेक वर्षांपासून चालली आहे. उत्तरप्रदेशात कॉंग्रेस ज्या मुस्लिम गठ्ठा मतांना गृहीत धरून राजकारण करत असे तो गठ्ठा मुलायमसिंग यांनी पळविला तेव्हापासून कॉंग्रेसची अवस्था तेथे चौथ्या क्रमांकावरचा पक्ष अशी झाली आहे. त्यामुळे दोघांचीही रस्सीखेच मुस्लिम मतांसाठी चालत असल्याने रस्सीखेच करण्याच्या खेळातील दोरी सोडून देऊन राष्ट्रीय राजकारणात एकत्र येण्याची या दोन पक्षांची स्थिती कधीच नसते. एका मताने अटलजींचे सरकार पडले तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होण्यासाठी लगबगीने तयार झाल्या होत्या, मात्र मुलायमसिंग यादव यांनी त्यांना पाठिंबा देणार नाही, असे सांगून ती हवा काढून घेतली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. संयुक्त पुरोगामी सरकारला पाठिंबा देणार्‍या मित्रपक्षांना गृहीत धरून कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांच्या नावाचा खल सुरू केला होता. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा यापैकी एका नावावर आता शिक्कामोर्तब होणार, असे सर्वजण निश्‍चित समजू लागले होते. मात्र, ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंग यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुस्तीतला धोबीपछाड डाव कॉंग्रेसवर टाकला. कॉंग्रेसच्या गोटात चर्चा चालू असलेल्या नावांबाबत काहीही न बोलता सरळ सरळ या दोन धुरिणांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि लोकसभेचे पूर्वाध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची नावे या पदासाठी सुचवून धमाल उडवून दिली. ही नावे जाहीर करणे हा केवळ सूचनावजा भाग नाही, तर लगेच दुसर्‍याच दिवशी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने धमकीवजाच विधान केले आहे. जर कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी किंवा हमीद अन्सारी यांची उमेदवारी जाहीर केली, तर आपला पक्ष ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा अन्य उमेदवारांना या निवडणुकीत उतरवेल, असे जाहीर केले आहे. वास्तविक पश्‍चिम बंगालमधील राजकारण हे ममता विरुद्ध डावे पक्ष असे चाललेले आहे. डाव्यांचा विरोध करणार्‍यात तेथे कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जी हे एकमेकांचे स्पर्धक आहेत. डाव्या पक्षांच्या सरकारला पर्याय म्हणून पश्‍चिम बंगालच्या जनतेने कॉंग्रेसऐवजी तृणमूल कॉंग्रेसला निवडले आहे. या पार्श्‍वभूमीवर ममताबाईंसारख्या नेत्या पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना सहजासहजी पाठिंबा देण्याची शक्यताच नव्हती. सोमनाथ चटर्जी यांनी डाव्यांनाही खडे बोल सुनावलेले आहेत. त्यामुळे प्रणव मुखर्जींपेक्षा त्यांना पर्याय म्हणून ममता बॅनर्जी यांनी तीन नावात सोमनाथ चटर्जी यांच्या नावाचा उल्लेख करून बंगाली अस्मितेलाही कुरवाळले आहे. प्रणव मुखर्जी यांना उघड विरोध करणार्‍या ममता बॅनर्जी आणि प्रतिभा पाटील यांना मराठी व्यक्ती असे म्हणत भगवे फेटे घालून कॉंग्रेसला मते देणारी शिवसेना यांच्या कार्यपद्धती आणि दृष्टीमधला फरक या निमित्ताने तीव्रतेने स्पष्ट झाला आहे. शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी बेईमानी करून कॉंग्रेसला मते देऊन काय साधले, ते प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द संपत आली तरी लोकांना अजून समजलेले नाही. सेनेच्या त्या विचित्र भूमिकेने ना मराठी अस्मितेचा काही फायदा झाला, ना हिंदुत्वाच्या चळवळीचा! सोनिया गांधींना हवी असलेली व्यक्ती राष्ट्रपतिपदावर बसविण्यात मात्र सेनेचे सहकार्य त्या वेळी कॉंग्रेसला मिळाले एवढेच झाले! क्रिकेटमधल्या गुगलीवर भल्या भल्या फलंदाजांची पंचाईत होते तसे ममतापूर्ण मुलायम गुगलीने कॉंग्रेसची चांगलीच पंचाईत करून टाकली आहे.

 वास्तविक कॉंग्रेसने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी किंवा अन्य कुणाचेच नाव अधिकृतपणे जाहीर केले नव्हते व प्रसारमाध्यमांच्या चव्हाट्यावर तशी अधिकृत चर्चा केली नव्हती. मात्र, सोनिया गांधींशीं चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांची नावे कॉंगे्रसने सुचविल्याचे जाहीर करून बिंग फोडले. निव्वळ बिंग फोडले असे नाही, तर त्या दोन्ही नावांना उघड विरोध करत या प्रक्रियेत आपला वरचष्मा दाखवून दिला.जी पर्यायी नावे ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंग यादव यांनी संयुक्तपणे जाहीर केली ती नावेही कॉंग्रेसला चकित करणारी आहेत.ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंग यादव यांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून जी तीन नावे सुचविली आहेत त्यामध्ये विद्यमान पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचे नाव सुचवून एक प्रकारे कॉंग्रेसची खिल्लीच उडविली आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. मात्र, राजकारणातले डावपेच फार विचित्र असतात. डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव ममता बॅनर्जी आणि मुलायमसिंग यादव यांच्या तोंडून आणण्यामागे कॉंग्रेसमधील धुरिणांचेच डावपेच असल्याचेही राजधानीत बोलले जात आहे.येणारी लोकसभेची निवडणूक ही डॉ.मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली जिंकणे कॉंग्रेसला अवघड असल्याने डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवून पंतप्रधानपदी राहुल गांधींना निवडणुकीच्या आधीच बसविण्याची योजना असावी, अशी शक्यता मांडली जात आहे. निवडणूक लढवून राहुल गांधी पंतप्रधानपद मिळविण्यात कितपत यशस्वी होतील, याबाबत शंका असल्याने थेट आधी या पदावर विराजमान होऊन त्या पदाच्या प्रभावाचा वापर करत निवडणुकीत तो करिष्मा वापरण्याची योजना असू शकते.

 देशाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा वापर राष्ट्रीय पातळीवरचे राजकीय पक्ष आणि अगदी छोटे प्रादेशिक पक्ष आपापल्या संकुचित राजकीय स्वार्थाकरिता करतात, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. राजकीय मुत्सद्देगिरीच्या अंतिम उद्देशाची पातळी किती खाली घसरली आहे, याचे हे अस्वस्थ करणारे चित्र या उमेदवारीच्या निमित्ताने उभे राहिले आहे. या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि त्यातील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने खूपच संयम पाळला आहे.संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यावरच आम्ही याबाबतीत व्यूहरचना आणि धोरण ठरवू, असे जाहीर करून त्यांनी वाट पाहणे पसंत केले आहे.हा संयम या निवडणुकीतील निर्णायक चाल ठरू शकतो, असे वाटू लागले आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही देशाच्या राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ घडविणारी ठरत आली आहे. ममता आणि मुलायमसिंग यादव यांच्या गुगलीने या निवडणुकीतही पुढील राजकीय उलथापालथींची बीजे पेरलेली असतील, याची चुणूक दाखविली आहे. पूर्वार्धातच रंगतदार झालेली ही राष्ट्रपतिपदाची निवडणूक अंतिमतः राजकीय पक्षांच्या सर्वसहमतीच्या प्रगल्भतेचा परिचय देते, की राजकीय मुत्सद्देगिरीचा दर्जा खाली आणते, ते भविष्यात स्पष्ट होईल !

No comments:

Post a Comment