Monday, June 4, 2012

समुद्राची पातळी वाढतेय!

  नवी दिल्ली, (३ जून) : वातावरणातील बदलामुळे समुद्राच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, यामुळे मुंबईसह समुद्राच्या पश्‍चिम आणि पूर्व किनारपट्टीवील अनेक शहरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 केवळ शहरांनाच नव्हे, तर गंगा, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि महानदीच्या किनार्‍यांवरील भागांना,सिंचनयुक्त जमिनींना आणि गावांनाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे. स्वत: सरकारनेच एका अहवालातून ही माहिती दिली.
 १९९० ते २१०० या काळात समुद्राची पातळी ३.५ ते ३४.६ इंच इतक्या प्रमाणात वाढणार आहे. याचा परिणाम जमिनीतील पाणीही समुद्रासारखेच खारे होण्यात होईल सोबतच, पिकावू जमीनही धोक्यात येईल. समुद्राची पातळी वाढण्याचा सर्वाधिक धोका गुजरातमधील खंबाट आणि कच्छ, मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा काही भाग आणि दक्षिण केरळचा किनारपट्टीवरील भागांना होणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.भारतातर्फे हा अहवाल संयुक्त राष्ट्राला सोपविण्यात आला आहे.देशातील १२० संस्थांमधील सुमारे २२० वैज्ञानिकांनी वातावरणातील बदलावरील हा अहवाल तयार केला आहे.
 या वैज्ञानिकांनी किनारपट्टीवरील काही राज्यांना भेटी दिल्या आणि आढावा घेतला. समुद्राची पातळी सातत्याने वाढत असल्याने कुठल्या शहरांना मोठा धोका होऊ शकतो, याचाही सविस्तर अभ्यास केला.

No comments:

Post a Comment