Monday, June 4, 2012

मागास विद्यार्थ्यांसाठी १०० नवी वसतिगृहे

अमरावती,(३ जून, तभा वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी राज्यात १०० नवीन वसतिगृह सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली.

 मोर्शी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या १०० मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन शनिवारी शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अनिल बोंडे, तर प्रमुख अतिथी डॉ. वसुधा बोंडे, पंचायत समिती वरुडच्या उपसभापती नीता जिचकार, मिलिंद पत्रे, रमेशदादा देशमुख, उपविभागीय अधिकारी दिनकर काळे,समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य उपस्थित होते.

 मुलीच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तालुकास्तरावर मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले की, राज्यात यापूर्वी २७१ वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी आणखी १०० वसतिगृह बांधण्यात येत असून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

 ज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या योजनेंतर्गत १५ लाख विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना ८५ टक्के जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येत होते तर १५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. या राखीव जागांवर या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

 डॉ. अनिल बोंडे व डॉ. वसुधा बोंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अमरावती जिल्ह्यात मुलांची ८,मुलींची १० अशी एकूण १८ वसतिगृहे असून विभागीय स्तरावर १००० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह कार्यरत असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक प्रवीण राऊत यांनी केले.

 संचालन राजीव पठान यांनी, तर आभार चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला मोर्शी व वरुडचे तहसीलदार,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी डॉ. भोजने, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनीसह नागरिकही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment