मुंबईसह महाराष्ट्रातल्या दहा महापालिका व सत्तावीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका नुकत्याच, म्हणजे गेल्या आठवड्यात पार पडल्या. आता त्यांंचे कवित्व सुरू झाले आहे. ते मात्र बराच काळ चालेल. एक तर मुंबईत आणि एकूणच ह्या सर्व महापालिका, तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधे कॉंग्रेसला फारसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस काही प्रमाणात पुढे सरकत असताना कॉंग्रेसची मात्र सगळीकडेच पीछेहाट झालेली पहायला मिळाली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर वगैरे शहरांमधे कॉंग्रेसला आपली पूर्वीची संख्याही राखता आली नाही. अमरावतीत त्यांंना थोडेफार यश मिळाले असले, तरी ते यश 'एक कोटीच्या रोकड कांडात' झाकोळले गेले. त्या यशाचा आनंद साजरा करण्यापेक्षा 'एक कोटीची रोकड' प्रकरण कसे मिटवायचे, याची चिंताच त्यांंना जास्त सतावते आहे. आता या सार्वत्रिक अपयशाचे खापर फोडण्यासाठी डोके शोधण्याचे काम सुरू झाले आहे.
दिल्लीतून महाराष्ट्रात रवानगी झालेले मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ती निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करणे शक्य होते, ते सर्व उद्योग त्यांंनी करून पाहिले. निवडणूक आयोगाला वारंवार आव्हान देत, आदर्श आचारसंहिता मोडीत काढली. सर्व संकेत धाब्यावर बसवून प्रशासकीय यंत्रणेचा जास्तीत जास्त गैरवापर केला. मुंबईच्या गल्लीबोळात जाऊन त्यांंनी सभा घेतल्या. महाराष्ट्राच्या आणि खास करून मुंबईच्या जनतेची मानसिकता त्याचप्रमाणे त्यांंना भेडसावणार्या प्रश्नांचीही नीट माहिती नसताना भन्नाट राजकीय भाषणे केली. अगदी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि भाजपा यांचे निवडणुकीनंतर नावनिशाण उरणार नाही, असा दावा छातीठोकपणे करण्यापर्यंत मजल मारली. भाजपाचे किंवा भाजपाचा पूर्वावतार असलेला जनसंघाचे नावनिशाण पुसून टाकू , अशी दर्पोक्ती (कै.)जवाहरलाल नेहरूंपासून दिग्विजय सिंगपर्यंत सर्वच कॉंग्रेसवाल्यांंनी वारंवार केली. अशा पद्धतीने आपल्या विरोधकांची नावनिशाणी पुसून टाकण्याची अस्सल कॉंग्रेसी मानसिकता उद्दामपणाने मिरवणार्या कॉंग्रेसी नेत्यांच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान त्यानिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत मिळवला. गेल्या त्रेसष्ट - चौसष्ट वार्षांमध्ये नेहरू - इंदिरा गांधींपर्यंत आणि यशवंतराव चव्हाण - दिग्विजय सिंगपर्यंत कोणालाही जे जमले नाही ते आपण करून दाखवू, असा बहुधा त्यांंचा समज असावा. पण मुंबईच्या जनतेने त्यांंना त्यांंची जागा दाखवून दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने जिंकलेल्या जागांची संख्या ही मुंबई महापालिकेत निवडून आलेली त्यांची आजवरची सर्वात कमी संख्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केल्यानंतरही हे अपयश त्यांच्या पदरी आले आहे. हे अपयश एवढे दारुण आहे की दोन्ही कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या जागांची एकत्रित संख्याही त्यांच्या पूर्वीच्या सदस्यसंख्येपेक्षा कमी आहे. गेली सहा सात दशके कॉंग्रेसला इमाने इतबारे साथ देणारी मुस्लिम व दलित मते सुद्धा या खेपेला कॉंग्रेसला मिळवता आली नाहीत. मुंबई शहरात कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिळून सहा खासदार आहेत. पण या खासदारांपैकी कोणीही निवडणुकीच्या मैदानात खर्या अर्थाने दिसले नाहीत. मिलिंद देवरा आणि एकनाथ गायकवाड प्रचारात नव्हतेच. प्रिया दत्त, संजय निरुपम तोंड दाखवण्यापुरते आले आणि तेवढ्या वेळातही नवे वाद निर्माण करून गेले. गुरुदास कामत तर उघड उघडपणे असंतोष प्रकट करीत होते. राष्ट्रवादीचे संजय पाटीलही अस्तित्वशून्य होते. कॉंग्रेसचे आमदार-खासदार आणि इतर पदाधिकार्यांना निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय करण्यात मुख्यमंत्र्यांंना पूर्णपणे अपयश आले. ठाणे-पुणे-नाशिक वगैरे शहरातही जवळपास थोड्याफार फरकाने हीच कहाणी होती. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे दोघेही या निवडणूक प्रचार मोहिमेत सर्वार्थाने निष्प्रभ ठरले. कॉंग्रेसचे इतर 'वजनदार' मंत्री तर या रणधुमाळीपासून पार अलिप्त होते. एकूणच पृथ्वीराज चव्हाण - माणिकराव ठाकरे - कृपाशंकर सिंग यांची कॉंग्रेस संघटनेवर पकड नाही, हे या निवडणुकांमधे निर्विवादपणे सिद्ध झाले.
या निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुखमंत्री अजित पवार यांच्यात जो बेलगाम कलगीतुरा झाला, तो तर अभूतपूर्व होता. दोन पक्ष एकत्र येऊन बनलेल्या सरकारचे नेतृत्व करणार्या दोन नेत्यांमध्ये बेबनाव असतो; एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी असे नेते सोडत नाहीत वगैरे सर्व खरे असले, तरी या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ज्या पद्धतीचे झाले तसे यापूर्वी कधीही कोणत्याही राजवटीत पहायला मिळाले नव्हते. या साठमारीचे नेतृत्व स्वत: मुखमंत्री आणि उपमुखमंत्र्यांनी केले. अतिशय खालच्या पातळीवर उतरून या दोन नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली. शेवटी जाहीरपणे कानपिचक्या देऊन ही धुळवड थांबवण्याचा प्रयत्न शरद पवारांना करावा लागला.
चव्हाण-पवारांचा जंगी सामना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला, हे खरे असले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने स्वत: शरद पवारसुद्धा काही पायर्या खाली उतरल्याचे दृश्य महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाले. केंद्रात मंत्री झाल्यानंतर आपण राज्याच्या राजकारणात काही बोलणार नाही, असा पवित्रा शरद पवार यांनी काही काळापूर्वी घेतला होता. राज्यातील राजकारणाबद्दलच नाही, तर राज्यातील शेतीबद्दल जरी कोणी प्रश्न विचारला तरी त्याला शरद पवार कमालीच्या तुच्छतेचे प्रदर्शन करून उडवून लावत असत; हा अनुभव पदरी असलेले अनेक पत्रकार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय भाग घेणे सुद्धा त्यांंनी बर्याच वर्षांपासून बंद केले होते. असे असताना यावेळेला मात्र महाराष्ट्रातील सगळ्या 'तरुण तडफदार' नेत्यांच्या बरोबरीने पवारसाहेब प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. मुंबई, पुणे, सोलापूर मध्ये त्यांंनी स्वत: सभा घेतल्या. सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंबरोबरची मैत्री तोडल्याचे जाहीर केले. मुंबईतही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत मैत्री असली, तरी त्यांंचा पराभव करण्याचे आवाहन केले. दोन्ही ठिकाणी त्यांंच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला नाही, हा भाग वेगळा! पुण्यातही त्यांंनी लक्ष घातल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. एकूणच शरद पवारांना हवा असलेला जनादेश त्यांना या निवडणुकांध्ये मिळवता आला नाही. पण नेहेमीप्रमाणेच त्यांच्या काही कृती व वक्तव्ये लोकांना कोड्यात टाकणारी वाटली.
मुंबई महापालिकेसाठी प्रचार संपल्यानंतर शरद पवार यांनी सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना 'खास आणि प्रदीर्घ' मुलाखती दिल्या. पण त्या मुलाखतींमधून त्यांंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा राज ठाकरे यांचाच प्रचार जास्त केला, असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती. त्या सर्व मुलाखतींमधे शरद पवार यांनी राज ठाकरे यांची सातत्याने जी भलामण केली, त्यामुळे मुंबईत मनसेच्या किमान पाच सहा जागा जास्त आल्या, असे मानायला जागा आहे. मनसे पंधरा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस मुंबईत पंचवीसच्या आसपास जागा जिंकेल असा सगळ्यांचाच अंदाज होता. पण प्रत्यक्षात चित्र उलटे दिसले. राज ठाकरेंना मुंबईत मिळालेल्या यशात शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतींचा मोठा वाटा आहे. अजित पवार यांचे घोडदौडीचे राजकारण शरद पवारांना फारसे मान्य नसावे, असे त्यांच्या अलीकडच्या अनेक वक्तव्यांवरून स्पष्ट झाले आहे. थेट जरी नाही तरी आडवळणाने अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्याचा प्रयत्न पवार साहेब करत असतात, हे अलीकडे वारंवार दिसून आले आहे. मुंबई महापालिकेत कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा आग्रह अजित पवार यांचा होता. त्यांंनी त्याप्रमाणे आघाडी घडवूनही आणली. पण त्या आघाडीचा व्हायला हवा तसा फायदा दोन्ही कॉंग्रेसना झाला नाही. उलट दोघांचेही नुकसानच झाले. हा निवडणुकांचा गदारोळ सुरू होण्यापूर्वी 'राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यापुढील काळात सामूहिक नेतृत्वाने काम करावे लागेल' असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यांचा हा इशारा अजित पवारांसाठी होता. आत्ताही त्यांनी हिरिरीने प्रचारात भाग घेतला तो सुद्धा बहुधा 'मी अजून इथे आहे आणि मीच बॉस आहे' हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवण्यासाठीच घेतला असावा. कारण काही झाले तरी पक्षाची सूत्रे आपल्या हातातून जाता कामा नयेत, असे त्यांंना वाटत असावे. 'यानंतर मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही' असे ते सतत सांगत असले, तरी राजकारणातून निवृत्त होण्याची त्यांंची कल्पना नाही. ते राज्यसभेवर जाणार आहेतच. आपल्या कर्तबगार पुतण्याच्या हातात निदान महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे निर्वेधपणे सोपवण्याचाही त्यांंचा इरादा दिसत नाही. म्हणूनच याही निवडणुकांच्या माध्यमातून काही खेळ मांडून 'अजूनही मीच मला हवे तसे महाराष्ट्राचे राजकारण नाचवतो' हे दाखवून देण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर त्यांच्या खेळाची काही नवी प्रात्यक्षिके बघायला मिळाली, तर कोणालाही आश्चर्य वाटता कामा नये!
------
लक्ष्यभेद : माधव भांडारी
तरुण भारत, आसमंत, सोलापूर दि. ११ मार्च २०१२

No comments:
Post a Comment