Tuesday, March 13, 2012

भ्रष्ट राजकीय गटाराचे फलित!

कृपाशंकरसिंह हे एकटे नाहीत. गावागावात, शहरात, राज्या -राज्यात असे कृपाशंकरसिंह अनेक आहेत. प्रत्येक प्रान्तात आहेत. अति झाले आणि आता हे यांचे काळे धंदे आता उघडे पडू लागले आहेत. हजारात, लक्षावधीत एक जरी प्रामाणिक माणूस यांच्या क्षेत्रात चुकून शिरला की त्याच्या माध्यमातून यांच्या भ्रष्ट व्यवहाराचे भेंडोळे बाहेर पडत आहे. राजकीय नियंत्रण नसलेल्या घटनात्मक संरक्षण असलेल्या निवडणूक आयोग, कॅग आणि न्यायालय अशा संस्थाच या लोकांना आता जरा वेसण घालू लागल्या आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा असो की राष्ट्रकुल खेळांचा असो, न्यायालयाने जर कठोर भूमिका घेतली नसती, तर अगदी पंतप्रधानांपासून सर्वांनी या घोटाळ्यातील आरोपींना आधीच क्लीन चिट देऊन टाकलीच होती! आताही न्यायालयाने आदेश दिले नसते, तर कृपाशंकरसिंह अजून टेचात लोकशाहीच्या, प्रशासनाच्या, जनतेच्या डोक्यावर मिरे वाटत हिंडत राहिले असते. दोन्ही हातांनी ओरबाडून माया जमवीत राहिले असते. आता कॉंग्रेस विकृतीतील ही मंडळी न्यायालय, कॅग, निवडणूक आयोग अशा तटस्थ, स्वायत्त संस्थांवरही घाणेरडे आरोप करत, त्यांचे मनोधैर्य कमी होईल, असे प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रयत्न अगदी संयमाने आणि नियोजन करून हाणून पाडले पाहिजेत.
 ---------------------------------------------------------
होय! कृपाशंकरसिंह हे कॉंग्रेसने या देशात सुरू केलेल्या राजकीय विकृतीचे फलित आहे. याला संस्कृती असे म्हणणे हा संस्कृती या शब्दाचा अवमान ठरेल. त्यामुळे विकृतीच म्हणावे लागेल. याला राजकीय प्रवाह म्हणणे ही प्रवाहाची बदनामी ठरेल, म्हणून याला गटार असेच संबोधणे योग्य ठरेल! कांदे-बटाटे विकणार्‍या कृपाशंकरसिंह याने काही वर्षांत कोट्यवधींची मालमत्ता मुंबईत जमा केली. पॉवर मॅनेजर अशा प्रकारचे काम कृपाशंकरसिंह करत होते. हायकमांडच्या सर्व व्यवस्था लावणारा माणूस, अशी कृपाशंकरसिंह यांची प्रतिमा होती. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे एक दुष्टचक्र कॉंग्रेसच्या राजकारणाने देशात रूढ केले आहे. हे दुष्टचक्र कसे काय रूढ झाले, असे जर कोणी विचारले, तर कृपाशंकरसिंह या माणसाची वाटचाल हे त्याचे उत्तर आहे. राजसत्तेचा वापर करून माया कशी जमवायची. पक्षाकरिता निधी जमवता जमवता आपल्या स्वत:करता त्यात हात कसा मारायचा, हायकमांडच्या इच्छा जाणून घेऊन त्या सर्व इच्छा पूर्ण कशा करायच्या आणि त्या इच्छा पूर्ण करताना मग आपल्या पोळ्याही कशा भाजून घ्यायच्या, याचे कृपाशंकरसिंह हे आदर्श उदाहरण आहे. नियम, कायदा, करपद्धती सर्वकाही निर्लज्जपणे आणि निर्ढावलेपणाने धाब्यावर कसे बसवायचे, याचे प्रात्यक्षिकच कृपाने दाखवून दिले आहे. दोन पॅनकार्डापासून ते करोडो रुपयांची मालमत्ता जमविण्यापर्यंत यांच्या या काळ्या कृत्यांचा आवाका आहे.
एक बेकायदेशीर काम करताना त्यात काही टक्के माया ते काम करणार्‍या माणसाला जमविता येते, असे जर गृहीत धरले, तर कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी माया जमविणार्‍या कृपाशंकरसिंह यांनी किती रुपयांची बेकायदेशीर कामे केली असतील, याची कल्पनाही करवत नाही. गृहराज्यमंत्र्यापासून ते मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत सर्व पदे त्यांनी मिरवली, उपभोगली आणि राबविली. माहितीचा कायदा झाला आणि त्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याला सुरुवात झाली. केवळ कायदा करून भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य नाही, अशी काही लोकांची समजूत होती. मात्र, माहितीचा कायदा आला आणि भ्रष्टाचार्‍यांची लक्तरे या कायद्याचा आधार घेऊन बाहेर येऊन वेशीवर टांगण्याला सुरुवात झाली तेव्हा लक्षात येऊ लागले आहे की, कायदा करण्याचाही फायदा आहे. माहितीच्या कायद्याचा वापरही काही नतद्रष्ट मंडळी  वाटमारीसाठी करू लागल्याचा अनुभव आहे. मात्र, ते सगळे पाप याच कायद्याचा वापर करून एका कृपाशंकरसिंहाच्या भानगडी बाहेर काढून संजय तिवारी यांनी जणू धुऊन काढले आहे. माहितीच्या कायद्याचा  वापर करून संजय तिवारी यांनी आधी माहिती एकत्रित केली आणि नंतर न्यायालयात धाव घेतली. त्या आधारेच न्यायालयाने कृपाशंकरसिंह यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरूप मोहन पटनाईक यांना दिले आहेत.
न्यायालयाने आदेश  दिल्यानंतरही या कचाट्यातून कृपाशंकरसिंह यांना पळून, सटकून जाता यावे यासाठी पुरेसा वेळ दिला गेला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तब्बल आठ दिवस पोलिसांनी काहीच केले नाही. कृपाशंकरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नकार देत पुढची तारीख दिल्यानंतर पोलिसांना कारवाई करणे क्रमप्राप्त झाल्याने, अखेर दि. २ मार्च रोजी पोलिसांनी कृपाशंकरसिंह यांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचा सपाटा सुरू केला. कृपाशंकरसिंह यांना आठ दिवसांचा अवधी पोलिसांनी का दिला? कृपाशंकरसिंह यांना वाचविण्यासाठी पोलिसांवर कोणी दबाव टाकला? या प्रश्‍नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. एखादा सामान्य माणूस आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करायला जरी पोलिस ठाण्यात गेला, तर जणू त्यानेच गुन्हा केला, अशा थाटात पोलिस त्या माणसाला भंडावून सोडतात. चुकून सामान्य माणसाने एखादा छोटा गुन्हा केला, तर पोलिस त्याला सळो की पळो करून सोडतात. मग कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर माया जमवणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप असताना आणि न्यायालयाने अगदी पोलिस अधिकारी अरूप मोहन पटनाईक यांच्या नावाचा उल्लेख करून आदेश दिला असतानाही, आठ दिवस कारवाई का झाली नाही? आताही फक्त जप्तीच झाली आहे. कृपाशंकरसिंह आणि त्यांच्या कुटुंबातील इतर आरोपींना अटक का झाली नाही? विदर्भातील दिलीप सानंदा प्रकरणात आरोपींना अटक करू नका, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिल्याचे नंतर उघड झाले होते. आता कृपाशंकरसिंह यांना अटक न करण्याबाबत कोणाचे आदेश आहेत? कशाकरिता?
कृपाशंकरसिंह यांच्या या सर्व कार्यकर्तृत्वात आणखी कोण कोण गुंतलेले आहेत? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांची बेनामी संपत्ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा त्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात कृपाशंकरसिंह यांचे नाव आले होते. कृपाशंकर यांच्या काळ्या कारस्थानांची पोहोच अशी कोठे कोठे गेलेली आहे? महामहीम राष्ट्रपतींचे सुपुत्र आणि पती यांचेही नाव कृपाशंकरसिंह यांच्या निकटवर्तीय लोकांमध्ये घेतले जात आहे. नुकतेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेसच्या एका गाडीत सापडलेल्या एक कोटी रोख रकमेचे गौडबंगाल अजून उकललेले नाही. या विषयातही राष्ट्रपतिपुत्राचे नाव घेतले गेले. चौकशीही झाली. देशाचे राष्ट्रपतिपद हे वादापासून मुक्त आणि घोटाळ्यापासून तर खूपच लांब असले पाहिजे. इतिहासात हे पाळले गेले आहे. मात्र, पहिल्यांदा राष्ट्रपतिभवनाकडे संशयाची सुई सरकली आहे. पहिल्यांदा राष्ट्रपतींच्या निकटवर्तीयांची नावे बेकायदेशीर कृत्यांच्या संदर्भात सर्रास चर्चेत आली आहेत. कॉंग्रेस नावाच्या विकृतीने हा अध:पात घडवून आणला आहे. रेल्वेचा अपघात झाला आणि चार लोक ठार झाले म्हणून नैतिक जबाबदारी घेत रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री कोणीकडे आणि बेनामी संपत्तीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि न्यायालयाने यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, तरी शेवटपर्यंत यातून स्वत:ला नामानिराळे ठेवण्याचा आटापिटा करणारे हे कृपाशंकरसिंह कोणीकडे? या कृपाशंकरसिंह यांना संरक्षण देण्यासाठी तपास यंत्रणेवर दबाव आणणारे उच्चपदस्थ हे कृपाशंकरसिंह यांच्याइतकेच बरबटलेले आहेत. हायकमांडची अंडीपिल्ली कृपाशंकरसिंह यांना माहीत आहेत, स्वत:साठी माया जमविताना हायकमांडचीही बरीच अशी कामे कृपाशंकरसिंह यांनी केलेली आहेत. ते बिंग बाहेर पडू नये यासाठी कृपाशंकरसिंह यांच्यावरील कारवाईचा बडगा टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न हे हायकमांड करत होते की काय? भ्रष्टाचारात स्वत:पुरती माया जमविणारा सापडला, तर त्याला तातडीने पदावरून कमी करायचे, तातडीने तुरुंगात ढकलून द्यायचे, हात वर करून आपण नामानिराळे राहायचे, अशी आता हायकमांडची हाय तर्‍हा झाली आहे. शिवाय आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही, तर लगेच कारवाई करतो, असे माध्यमासमोर येऊन कॉंग्रेसचे प्रवक्ते सांगू लागले आहेत. मात्र, कृपाशंकरसिंह यांच्याबाबत हे घडत नाही. कारण, कृपाशंकरसिंह यांच्या बेकायदेशीर कृत्याचे जाळे मोठे आहे आणि त्यात अनेक मोठे नेते अडक लेले असावेत, अशी शक्यता आहे.
स्वराज्याच्या आधीपासूनच कॉंग्रेसमधील स्वार्थी, भंपक आणि संधिसाधू नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि सोयीने बदलणारे सिद्धांत या दोनच तत्त्वांवर राजकीय कार्यपद्धतीचा विकास केला आहे. कॉंग्रेसचा मांडव डोक्यावर ठेवायचा आणि त्या मांडवाखाली स्वत:चा करता येईल तसा कोणत्याही मार्गाने फायदा करून घ्यायचा. हा फायदा करताना ना सिद्धांत ना तत्त्व! वेळ येईल तसे आणि सोय होईल तसे तत्त्व गुंडाळून ठेवायचे, सिद्धांत बदलून टाकायचे. पोपटासारखी कोणतीही भाषा वापरायची. कधी राजकारण संन्यास घ्यायचा, तर कधी घर जळते आहे असे म्हणत पुन्हा राजकारणात यायचे. कधी जातीयवादाला विरोध करण्यासाठी आपण बंड करत आहोत, असे म्हणायचे, तर कधी एकाधिकारशाहीचा विरोध करण्यासाठी स्वाभिमान जागवत असल्याचा आव आणायचा. वेळ आली तर मग स्वत:च जातीयवाद करायचा, स्वत:च हायकमांडचे जोडे उचलायचे, अशा कशाही कोलांटउड्या घेत पुन्हा जमिनीवर पाय येतील अशा मांजरासारख्या उड्या मारत सत्तेची खुर्ची मात्र बळकवायची!  कृपाशंकरसिंह हे या उलट्या सुलट्या, सोयीच्या, काळ्या, बेकायदेशीर, बेमुर्वतखोर राजकीय कार्यपद्धतीच्या गटारातून निघालेले फलित आहे.
कृपाशंकरसिंह हे एकटे नाहीत. गावागावात, शहरात, राज्या राज्यात असे कृपाशंकरसिंह अनेक आहेत. प्रत्येक प्रान्तात आहेत. अति झाले आणि आता हे यांचे काळे धंदे आता उघडे पडू लागले आहेत. हजारात, लक्षावधीत एक जरी प्रामाणिक माणूस यांच्या क्षेत्रात चुकून शिरला की त्याच्या माध्यमातून यांच्या भ्रष्ट व्यवहाराचे भेंडोळे बाहेर पडत आहे. राजकीय नियंत्रण नसलेल्या, घटनात्मक संरक्षण असलेल्या निवडणूक आयोग, कॅग आणि न्यायालय अशा संस्थाच या लोकांना आता जरा वेसण घालू लागल्या आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा असो की राष्ट्रकुल खेळांचा असो, न्यायालयाने जर कठोर भूमिका घेतली नसती, तर अगदी पंतप्रधानांपासून सर्वांनी या घोटाळ्यातील आरोपींना आधीच क्लीन चिट देऊन टाकलीच होती! आताही न्यायालयाने आदेश दिले नसते, तर कृपाशंकरसिंह अजून टेचात लोकशाहीच्या, प्रशासनाच्या, जनतेच्या डोक्यावर मिरे वाटत हिंडत राहिले असते. दोन्ही हातांनी ओरबाडून माया जमवीत राहिले असते. आता कॉंग्रेस विकृतीतील ही मंडळी न्यायालय, कॅग, निवडणूक आयोग अशा तटस्थ, स्वायत्त संस्थांवरही घाणेरडे आरोप करत त्यांचे मनोधैर्य कमी होईल, असे प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रयत्न अगदी संयमाने आणि नियोजन करून हाणून पाडले पाहिजेत.
आता जनताजनार्दनाचे चक्र फिरले पाहिजे. आता जागृतीच्या प्रकाशात जनतेने या लोकांच्या काळ्या व्यवहारांना उघड करण्यासाठी संजय तिवारीप्रमाणे जागल्याची भूमिका केली पाहिजे. कायदा आणि नियम गुंडाळून खुुंटीला टांगत गैरव्यवहार करणार्‍या या नतद्रष्ट लोकांना कायद्याच्याच साहाय्याने उघडे पाडले पाहिजे. गावागावात, राज्याराज्यात असे जेवढे कृपाशंकरसिंह असतील, त्यांच्या बेनामी संपत्तीवर टाच आणून त्यांना बेड्या ठोकण्यापर्यंत या गटारस्वच्छतेचा पाठपुरावा केलाच पाहिजे. तक्षकाय स्वाहा असे नको, तर तक्षकाय स्वाहा सोबत इंद्राय स्वाहा, असे म्हणत या नतद्रष्ट लोकांच्या मागे आपली ताकद उभी करणारे जे कोणी शरमिंदे असतील, त्यांनाही या स्वच्छतेच्या यज्ञात फरफटत ओढत आणून त्यांची आहुती दिली पाहिजे. त्याशिवाय ही स्वच्छता मोहीम पूर्ण होणार नाही. भ्रष्ट व्यवहार करताना यांना धास्ती वाटली पाहिजे. असे परिणाम दिसले तरच यांची अशी कायदा नाकारण्याची, कायदा गुलाम करण्याची, व्यवस्था नासविण्याची हिंमत होणार नाही!
---------------
प्रहार : दिलीप धारूरकर
तरुण भारत, आसमंत, सोलापूर दि. ११ मार्च २०१२ 

No comments:

Post a Comment