Tuesday, March 13, 2012

यांना फक्त ‘गोधरा’च का आठवतो ?

२७ फेब्रुवारीला झालेल्या गोधरा हत्याकांडाची आठवण काढण्याची देखील ज्यांनी तसदी घेतली नाही, ज्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यातील दोस्तीच्या गोष्टी करताना केवळ आणि केवळ हिंदूंना निर्दयी हत्यारे आणि भगव्या आतंकाच्या रूपात चित्रित करण्यातच धन्यता मानली, त्यांची गणना खरोखरीच भारतात सर्वाधिक सांप्रदायिक वैमनस्य वाढवणार्‍यांमध्ये केली जायला हवी. धर्म आणि आस्थेच्या आधारावर मारेकर्‍यांना, हल्लेखोरांना शिक्षा द्यायची की त्यांचा सत्कार करायचा, हे ठरवणारे लोक हेच आहेत. हिंदू आई आणि मुस्लिम आईच्या डोळ्यातील अश्रूंच्या खारटपणात फरक करणारे लोकसुद्धा हेच आहेत. या लोकांनी कधीच काश्मीरमधून निर्वासित झालेल्या हिंदूंबद्दल किंवा १९८४ मध्ये शीखविरोधी दंगलीत मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांबद्दल साधा शोक सुद्धा व्यक्त केला नाही. तथापि, गुजरातच्या आपत्तीला धर्माच्या नावाने विभाजित करून गदारोळ करण्यास हे लोक चुकले नाहीत. या सार्‍या प्रकाराकडे पाहिले, तर त्याला भारतीय लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावे लागेल.
फेब्रुवारी २००२ मध्ये मी माझ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात बसलो होतो. दोन वाजताच्या सुमारास माझ्या एका संपादक मित्राचा दूरध्वनी आला. त्यांनी अतिशय तणावपूर्ण आणि कंठ दाटून आलेल्या स्वरात साबरमती एक्सप्रेसची अतिशय दु:खद घटना मला सांगितली. त्यानंतर एका पाठोपाठ एक फोन येत गेले आणि त्या जीवघेण्या घटनेमधील प्रत्येक माहितीमुळे आमच्या अंगावर शहारे उभे राहू लागले. ५९ लोक, जे कुठूनसे आले असतील, त्यांच्या विश्‍वासाचा रंग कोणता का असेना, पण ते सारे हिंदुस्थानी आणि तिरंग्याला सर्वोच्चपदी ठेवून, राष्ट्रधर्म मानणारे होते. साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली तेव्हा म्हातारे, मुलं आणि स्त्रियांनी आपले प्राण वाचविण्याचे किती कसोशीने प्रयत्न केले असतील, याचा विचार करून आमची मने सुन्न झाली होती. त्यांनी दारं-खिडक्या वाजवून, डब्यातून बाहेर पडण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न केला असेल का? असा विचार करूनच डोके जड झाले होते. खिडकीचा एखादा जरी गज निघाला तरी त्यातून आपण नाही, तर आपली मुलं-बाळं यांना तरी बाहेर काढता आलं असतं, असाच विचार त्यांच्या मनात आला असावा. पण यापैकी काहीच झाले नाही. आग इतकी भयानक होती की कोणीच वाचू शकले नाही. ओरडू शकले नाही; बंद तबेल्यात होरपळून सार्‍यांचा कोळसा झाला. ५९ संख्या होती त्यांची. दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात हा सारा खुलासा झाला. माझ्याकडे १८ वर्तमानपत्रे येतात. त्यावेळी कदाचित त्याहून अधिक येत असावे. कोणत्याच वर्तमानपत्राने मरणारे आणि मारणारे त्यांच्या रंग-रूपाचा, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या कपाळावरील टिळ्याचा आणि डोक्यावरील टोप्यांचा साधा उल्लेखही केलेला नव्हता. सार्‍यांनी जातीय विद्वेष लपवण्याचा, तो दाबून ठेवण्याचा, तसेच तो पसरू न देण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे, ही सारी वर्तमानपत्रे वाचल्यावर पटकन ध्यानात येत होते.
त्या वर्षी २९ फेब्रुवारी ही तारीख नव्हती. तीन दिवसांनी जी घटना घडली, त्याची जी छायाचित्रे, वृत्तांकने वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली, त्यामुळे तर सारे शरीरच थंडगार झाले. गोधरा आणि गुजरातच्या इतर भागांमध्ये सुरू असलेल्या दंग्यांच्या अवधीत एकाही पुढार्‍याने अथवा राजकीय पक्षाने तिखट आणि तीव्र प्रतिक्रिया देण्यात पुढाकार घेतला नाही.
ज्या प्रसिद्धिमाध्यमांनी आणि नेत्यांनी गोधर्‍याच्या घटनेनंतर शांत राहाणे आणि संयमित भूमिका घेणे पसंत केले होते, तीच माध्यमे उत्तरार्धातील दंग्यानंतर ताळमेळ सोडून लिहू लागली. एका आस्थेवर विश्‍वास ठेवणारे लोकच सर्वाधिक भयानक आणि अमानवीय मानसिकतेचे आहेत, असा ठपका ठेवला जाऊ लागला. प्रत्येक व्यक्तीचा धर्म आणि विश्‍वास याचा उल्लेख करून संपादकीय आणि बातम्या रंगवल्या जाऊ लागल्या. त्या समाजाने प्रतिशोध घेण्याचे सारे विक्रम मोडीत काढल्याची भावना पसरवून, या सार्‍या घटनांसाठी नेता म्हणून त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीवर दोषारोपण केले जाऊ लागले. कुठल्याही निर्दोष व्यक्तीच्या हत्येमुळे क्रुद्ध होणे स्वाभाविक आहे, त्याविरुद्ध आवाज उठवलाच जायला हवा आणि हिमतीने परिणामांची पर्वा न करता, हत्यार्‍यांचा प्रतिकारही करायला हवा, हे तर कुणी नाकारूच शकणार नाही. पण गुजरात दंगलींच्या संदर्भात पूर्वनियोजित कारस्थानाप्रमाणे खोट्या बातम्या, अर्धसत्य बातम्या आणि स्वरचित वृत्तांकने जनतेच्या माथी मारण्याचे धोरणच आखले गेले. कुठले माध्यम आणि कुठली व्यक्ती जास्त बदनामीकारक वृत्त देते, याची जणू स्पर्धाच सुरू झाली. या कारणानेच जातीय तणाव आणि धार्मिक आधारावर ध्रुवीकरण जादा तीव्रतेने झाले. ज्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतले, तेच लोक जातीय तणाव वाढवण्यासाठी, तसेच उभय समुदायात आक्रमकता वाढविण्यासाठी चिथावणी देत होते.
ते शांतता आणि सर्वपंथ समभावाचे गुणगान तर करीत होते, पण त्यांच्याचमुळे परस्परांमधील अविश्‍वास वाढत गेला आणि जखमांचे घावही अधिक खोलवर जायला प्रारंभ झाला. आपल्या देशातच नव्हे, जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात आस्था, धर्म, वैचारिक मतभेद आणि विचारधारांच्या संघर्षामुळे सर्वाधिक लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. ही खरोखरीच आश्‍चर्याची आणि खेदाची बाब आहे. आस्था, धर्म अथवा कोणत्याही विचारधारेच्या लोकांनी जनमानस जोडण्याचा, तसेच झालेल्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. पण वस्तुस्थिती अशी आहे की, नेहेमीच याच्या विरुद्ध कृती होताना दिसते. गुजरातेतही असेच झाले. जखमी झालेला हिंदू असो वा मुस्लिम, एक हिंदुस्थानी या नात्याने प्रत्येकाच्या जखमेवर मलम लावून, प्रेमाची फुंकर घातली जायला हवी. गोधरा कांडात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या दु:खाची तर दखलच घेतली गेली नाही, ही खरोखरीच खेदाची बाब आहे. उलट एकदुसर्‍यांच्या जिवावर उठलेले जमाव प्रतिपक्षाच्या तंबूत घुसवण्याच्या प्रयत्नांना खतपाणी घातले गेले. ज्या घरात मृत्यू होतो, तेथे रक्ताच्या आसवांनी दिवे विझविले जातात आणि कोणत्याही व्यक्तीच्या दु:खात आनंद मानणे हे मानवता सोडून पशुतुल्य वर्तन आहे, याचा आम्हाला विसर पडला. आपला तर विभाजित परिवार असल्याने त्यापासून कोणी भयभीत होत नाही आणि कुणाला त्याची चिंता करावीशीही वाटत नाही. तथाकथित हिंदू संघटना सुद्धा आपल्या प्राधान्यानुसार आपल्याच लोकांविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध आणि नेत्यांविरुद्ध कारस्थान करण्यात रुची दाखवतात. आपली सफलता निर्विवाद सिद्ध व्हावी, यासाठी स्वातंत्र्यानंतर असा एकतरी हिंदूंचा मुद्दा त्यांनी दाखवून द्यावा. जोवर एखादी व्यक्ती आपली ताकद आणि त्याच्या परिघाबाहेरच्या मित्रांच्या आणि आम जनतेच्या सहकार्याने आकाशाएवढी मोठी होत नाही, तोवर स्वत:ला हिंदूंच्या कैवारी म्हणवून घेणार्‍या संघटनादेखील त्याच्यावर प्रहार करणे, त्याच्यावर टीका करणे थांबवत नाहीत. एकदा का या व्यक्तीने आपले विश्‍वरूपदर्शन दाखवले, की सार्‍या व्यक्ती त्याचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून धावाधाव करायला लागतात. म्हणून समाजाच्या या वर्गाला सोडून, त्या दुसर्‍या जमातीच्या लोकांना हा प्रश्‍न विचारायला हवा की, जर आपण सारे हिंदुस्थानींना एकाच नजरेने पाहता, समाजातील धार्मिक विद्वेष बाजूला सारून शांतता आणि बंधुभावना निर्माण करण्याची भाषा बोलता तर मग आपण गोधरा आणि गुजरातच्या बाबतीत वेगळे निकष का लावता? खोटी बयानबाजी करून भुतासारखा पिच्छा का करता? गुजरातला वारंवार आठवणच करून द्यायची असेल, तर ती काश्मिरी हिंदूंची, दिल्लीतील शिखांची, त्रिपुरा आणि मिझोरामची, रियांग, मीरपूर पंजाबी आणि नादिरशहापासून माओवाद्यांनी केलेल्या सामूहिक कत्तलींची करून द्यायला हवी. अजून किती वर्षे याचा पुनरुच्चार करायचा. याचा सुद्धा फैसला आता होऊन जायला हवा.
------
अन्वयार्थ : तरुण विजय
तरुण भारत, आसमंत, सोलापूर दि. ११ मार्च २०१२ 

No comments:

Post a Comment