१९८० च्या आसपास मुंबईत एक चित्रपट लागला. नव्या चित्रपटाची दखल घेणार्या स्तंभामधून त्याचा उल्लेख झाला. पण फारशी भलामण झाली नाही. कारण त्यात तुफान हाणामारी, उत्तान कामुक दृश्ये, शेंबडं टीन एज लव्ह वगैरे चालू मसाला नावालाही नव्हता. असला सिनेमा इंग्रजी सिनेस्तंभलेखकांना कसा बरं आवडेल?
पण तोंडातोंडी या सिनेमाची प्रसिद्धी मुंबईत वार्यासारखी पसरली आणि प्रेक्षकांचे जत्थे चर्चगेटच्या इरॉस थेटराकडे लोटू लागले. त्यात शाळकरी मुलं होती. सेवानिवृत्त वृद्ध होते. नरिमन पॉईंटचे नोकरदार होते नि फोर्टमधल्या उच्चभ्रू कॉलेजातली टपोरी मुलं देखील होती. समाजातल्या सर्व थरांना खेचणार्या त्या चित्रपटाचं नाव होतं 'ब्युटिफुल पीपल!'
असं होतं तरी कोण त्यात? मेरलिन मन्रो? ऑड्रे हेपबर्न? की एलिझाबेथ टेलर? छे, छे! त्यात मानवी नटनटी नव्हतेच. दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात आणि कॅलहारी वाळवंटात आढळून येणार्या असंख्य प्राण्यांनी त्यात काम केलं होतं. हत्ती होते, वाघ-सिंह होते. जिराफ होते. झेब्रे होते. वानर होते. गरुड होते. महाकाय कोळी होते... आणि होय, केवळ सूक्ष्मदर्शकातूनच दिसतील असे असंख्य सूक्ष्म कीटकही होते. विविध ऋतूंमध्ये हे सगळे जीव कसकसे वागतात; त्यांच्या दैनंदिन जीवनात कसकसे बदल होत जातात, याचं कमालीचं बहारदार चित्रण त्यात केलेलं होतं. त्यातली नटमंडळी भाडोत्री नव्हती. त्यांच्या राहण्याफिरण्याच्या जागांजवळ कॅमेरे लावून केलेलं जिवंत चित्रण होतं ते!
अशा जिवंत चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजाला हात न घातला तरच नवल! चित्रपट तडाखेबंद चालू लागला. हा-हा म्हणता त्याने शंभर दिवस पूर्ण केले आणि अचानक चित्रपटावर बंदी आली. का, तर म्हणे, त्याचं चित्रण दक्षिण आफ्रिकेत झालेलं आहे आणि वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेबरोबर कोणतेही संबंध न ठेवण्याचं सरकारचं धोरण आहे. तात्पर्य, कुणीतरी अगदी ठरवून एका उत्तम, खर्या चित्रपटाचा 'गेम' केला. दक्षिण आफ्रिकेतली राजवट बदलली, तिथल्या सरकारशी आता सगळ्यांचे संबंध सुरळीत झाले.
पण 'ब्युटिफुल पीपल' सेकंड रनला कुठेही लागलेला नाही. म्हणजे लोकांना खरा चित्रपट आवडतो; पण सिनेमावाल्यांनाच लोकांना खरं दाखवायला आवडत नाही. सचोटीने व्यापार करूनही पैसा मिळवता येतो; पण बहुसंख्य व्यापार्यांना अप्रामाणिकपणे पैसा मिळवायलाच आवडतो, तसंच हे असावं.
लंडनच्या इंपीरियल वॉर म्युझियमला त्यांच्या जामदारखान्यात अलीकडेच एक खरा चित्रपट सापडला. तो खरा म्हणजे भलताच खरा निघाला. त्यामुळे बघणारे हादरून गेले. कुणीतरी १९९० साली म्युझियमला हा चित्रपट भेट दिला होता.
त्यात काय आहे, हे पाहायला देखील कोणाला सवड नव्हती. परवाच्या मे महिन्यात म्युझियमचे एक अधिकारी के ग्लॅडस्टोन यांनी बघू या तरी काय आहे, म्हणून फिल्म प्रोजेक्टवर चढवली आणि ते खुर्चीतल्या खुर्चीत दाणकन उडालेच.
तो भारताच्या फाळणीवरचा चित्रपट होता. भीष्म सहानीच्या 'तमस' सारखा खोटा नव्हे; खराखुरा! म्हणजे असं की, भारत-पाकिस्तानच्या सीमावर्ती गावामधल्या भयानक कत्तलींची, लुटालूट, जाळपोळ नि अत्याचारांची; मिळेल ते सामान घेऊन रक्तबंबाळ स्थितीत भारताकडे धावणार्या लक्षावधी निर्वासितांची ती लाईव्ह फिल्म होती. ती कुणी नि कशी घेतली? कोणत्यातरी उच्चपदस्थ व्यक्तीच्या हुकमावरून भारत-पाकिस्तानमधील विविध लष्करी ठाण्याच्या ब्रिटिश अमलदारांनी हे चित्रीकरण केलेलं आहे. विशेष म्हणजे ते रंगीत आहे. अशाप्रकारे चित्रण करण्याचा हुकूम कुणी दिला; वेगवेगळ्या ठाण्यांवरची फिल्म कुठे एकत्रित करण्यात आली; ती इंग्लंडला कुणी नेली; १९९० पर्यंत ती कुठे होती नि त्यावर्षी म्युझियमला ती भेट म्हणून कुणी दिली, याबद्दल कुणीही अवाक्षर देखील बोलत नाही.
पण ज्या थोड्या लोकांनी हा खरा चित्रपट पाहिलाय्, त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. के. ग्लॅडस्टोन म्हणतात, 'निर्वासितांची ती दृश्यं विलक्षण आहेत. तुम्ही अलिप्त मनाने ती पाहूच शकत नाही.' इतिहासकार ऍण्ड्र्यू रॉबट्र्स म्हणतात, 'सत्तांतराच्या कालखंडात किमान एक लाख लोक मेले, असं ब्रिटिश प्रशासनाने अधिकृतपणे मान्य केलं आहे. पण माझ्या अभ्यासानुसार किमान साडेसात लाख लोक ठार झाले असले पाहिजेत. हा आकडा अलीकडच्या रूवांडा किंवा बोस्निया इथल्या वांशिक कत्तलीपेक्षाही मोठा आहे.'
ऑव्हर्व्हरचा प्रतिनिधी लिहितो, 'भारतातलं ब्रिटिश प्रशासन हे सुव्यवस्थितपणे आणि स्थानिकांच्या सहकार्याने राज्य चालवत होतं, असं जे सांगितलं जातं, त्याच्यावर विश्वास ठेवणं याउपर अशक्य व्हावं, इतकी या चित्रपटातील दृश्यं भीषण आहेत.' हा प्रतिनिधी पुढे लिहितो ते फारच महत्त्वाचं आहे. तो म्हणतो; 'लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना आज आम्ही युवराज चार्ल्सचे मोठे काका किंवा त्याला घडवून तयार करण्यात मोठा वाटा उचलणारे म्हणून ओळखतो, त्याचं कौतुक करतो; पण ही फिल्म पाहिल्यानंतर माऊंटबॅटन हे एक बढाईखोर आणि नको तिथे ढवळाढवळ करणारे गृहस्थ होते, हे कळून येतं.'
या फिल्मचा उपयोग करून घेऊन ब्रिटनमधील आयटीव्ही वाहिनी आता एक मालिका बनवत आहे. इतिहासकार ऍण्ड्र्यू रॉबट्र्स आणि ज्युडिथ ब्राऊन यांनी मालिकेच्या निर्मात्या लुसी कार्टर यांना साहाय्य केलं आहे. ल्युसी कार्टर म्हणतात, 'इतका भयंकर खरा चित्रपट मी जन्मात कधी पाहिला नव्हता. ते संपूर्ण जगातलं सगळ्यात मोठं सक्तीचं स्थलांतर होतं. आम्ही मालिकेत त्यातली शक्य तितकी दृश्यं घेणार आहोत. मालिकेसोबतच एक पुस्तक, एक चित्रफीत आणि एक चित्र तबकडी (सीडी) देखील आम्ही काढणार आहोत.' फाळणीनंतर इतक्या वर्षांनी का होईना, पण हिंदू समाजाला किती जबर किंमत चुकवावी लागली, याचं प्रत्यक्ष दर्शन वर्तमान हिंदू समाजाला घडेल. कॉंग्रेसी पुढार्यांच्या नाकर्तेपणामुळे, सत्तेच्या हपापामुळे एवढा भयानक रक्तपात झाला. एका परीने हा चित्रपट म्हणजे हिंदू समाजाचा आरसा देखील आहे. जो समाज आत्मविस्मृत, अस्मिताविहीन होतो, त्याची ही अशी भयानक दुर्दशा होते. पंचावन्न वर्षांपूर्वी झाली; उद्या देखील होऊ शकते. तेव्हा, अर्जुना, जागा हो, रथारूढ हो!
खोटा चित्रपट
'हनिबाल' हा खिस्तपूर्व काळातला एक महान सेनापती गणला जातो. इसवी सन पूर्व २४७ ते १८३ हा त्याचा कालखंड. तो काळ रोमन साम्राज्याच्या चढायाचा, मोहिमांचा आणि भराभराटीचा होता. रोमन योद्धे पूर्वेकडे आशियात नि भूमध्यसमुद्रापार उत्तर आफ्रिकेत साम्राज्यविस्तार करण्यात मग्न होते. त्यांनी पॅलेस्टाईन जिंकला होता. इजिप्तसारखा बलाढ्य देश घशात घातला होता आणि अशावेळी त्यांच्यासमोर सव्वाशेर बनून उभा ठाकला हनिबाल. उत्तर आफ्रिकेच्या किनार्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडे ईजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, अल्जेरिया आणि मोरोक्को असे देश आहेत. आज या पाचही देशांत अरबी वंशाच्या मुसलमानांची सत्ता आहे. त्यातला ट्युनिशिया हा चिमुकला देश म्हणजे हनिबालांची मायभूमी. तेव्हा त्या देशाला म्हणत कार्थेज.
कार्थेजवर स्वामित्व स्थापन करण्याचा रोमनांचा आटोकाट प्रयत्न चालू होता. रोमन आणि कार्थेजियन यांच्यात अनेक रोमहर्षक सागरी युद्ध झडली आहेत. पण अवघ्या बाविसाव्या वर्षी कार्थेजचा सेनापती बनलेल्या हनिबालने या युद्धाला वेगळाच आयाम दिला. भूमध्य सागरातून थेट इटलीवर धडकण्याऐवजी हनिबाल स्पेनमध्ये गेला. तिथून मोठमोठ्या मजला मारीत तो आल्स पर्वत ओलांडून एकदम रोमच्या पिछाडीवर उतरला. रोमन सेनापती सीपिओ याचा त्याने धुव्वा उडवला. रोम अजिंक्य नाही, हे त्याने तत्कालीन जगाला दाखवून दिलं. ही घटना इ. स. पूर्व २१८ सालची. यानंतर दोन वर्षांनी इ. स. पूर्व २१६ साली कॅने इथल्या अतिप्रसिद्ध लढाईत तर हनिबालने रोमनांना इतका जबर मार दिला की, ५० हजारावर रोमन सैनिक ठार झाले.
पण दिवस बदलत असतात. इ. स. पूर्व २०२ सालच्या झामाच्या लढाईत हनिबालचा पराभव झाला. कार्थेजवर रोमनांनी अपमानकारक तह लादला. हनिबालसारख्या रणधुरंधराला लष्करातून सक्तीने निवृत्त होऊन मुलकी प्रशासनात शिरावं लागलं. पण हनिबालने तिथेही आपली चमक दाखवली. उत्तम नागरी प्रशासक म्हणून त्याने लौकिक मिळवला. रोमनांना तेही सहन होईना. तेव्हा नाईलाजाने हनिबाल कार्थेजमधून बाहेर पडला आणि सीरियाचा राजा अँटिओकस याच्या सेनेत त्याने नोकरी पत्करली. सीरिया आणि रोम यांच्या युद्धात सीरियन सेनापतींनी हनिबालचा सल्ला मानला नाही. परिणामी सीरियाने मार खाल्ला. मग हनिबाल बिथिनियाच्या राजाकडे गेला आणि त्याच्यातर्फे त्याने रोमचा मित्र परगॅमस याच्यावर हल्ले चढवून त्याला हैराण केलं. परंतु बिथिनियाच्या सैन्याचा जीव फार छोटा होता. रोमन सम्राटाचा हनिबालला ताब्यात देण्याचा निर्वाणीचा खलिता आल्यावर बिथिनियांकडे काही पर्याय नव्हता. अखेर हनिबालने विष खाऊन मरण पत्करलं आणि सगळ्यांचीच सुटका केली.
हनिबालचा वंश कोणता होता? धर्म कोणता होता? रंगाने तो काळा होता की गोरा? इतिहासात कुठेही याचा काहीही उल्लेख नाही. उत्तर आफ्रिकेतले भूमध्य सागराच्या किनार्यावरचे पाचही देश आज अरब वंशाचे आहेत. पण अरबांनी ते जिंकण्यापूर्वी तिथले मूळ रहिवाशी कोण होते? ज्यांना शास्त्रीय भाषेत 'नेग्रिटो' वंशाचे किंवा सामान्य भाषेत निग्रो म्हणतात, ते काळ्या वर्णाचे आफ्रिकन? माहीत नाही. परंतु कृष्णवर्णी निग्रो लोक मध्य आफ्रिकेपासून खाली आढळतात. त्यामुळे मुळात तिथले लोक कृष्णवर्णी नसावेत. मग हनिबाल कोण होता? माहीत नाही. तो एक रणधुरंधर सेनानी आणि तितकाच कुशल प्रशासक होता, एवढंच इतिहासाला माहीत आहे.
पण हॉलीवूडवाले इतिहासाची फारशी पत्रास ठेवत नाहीत. त्यांनी हनिबालवर चित्रपट काढला नि त्यात हनिबालला कृष्णवर्णीय आफ्रिकन दाखवला. का बरं? कारण कृष्णवर्णीय हनिबाल आणि गोरे रोमन यांच्यात संघर्ष दाखवला की, त्याला वर्तमान राजकीय संदर्भ मिळतो. असा चित्रपट हमखास हिट होणार.
आखिर हमे धंदा करना है जानी!
विश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले
तरुण भारत, आसमंत, सोलापूर दि. ११ मार्च २०१२
--
Amar P. Puranik,
Sub-Editor,
Tarun Bharat,
Solapur - 413005
Hindusthan Samachar,
New Delhi - 110055
Resi. Address
960, North Sadar Bazar,
Solapur - 413003
Cell Ph. No : 09370405062
E-Mail : aamarpuranik@rediffmail.com
aamarpuranik@gmail.com
Blog : www.amar-puranik.blogspot.com
अमर पुराणिक
उपसंपादक,
दैनिक तरुण भारत, सोलापूर.
हिंदुस्थान समाचार, नवी दिल्ली.
फोन नं : ०९३७०४०५०६२
No comments:
Post a Comment