Wednesday, August 1, 2012

चकाकते करीअर : एक्स्ट्रा डिग्री

उत्तम नजर, कलाकौशल्याचं उत्तम ज्ञान, चांगली संवादक्षमता याचबरोबर रत्नांची अचूक पारख, त्यावर तासन्‌तास काम करण्याची आवड असेल तर तुम्ही रत्नपारखी म्हणून करीअर करू शकता. फॅशन इंडस्ट्री बरोबरच ज्वेलरीची क्रेझ वाढल्याने जेमॉलॉजिस्टच्या संधी उपलब्ध आहेत.
दागिने म्हणजे स्त्रियांचा आवडता विषय. कुठल्याही समारंभावेळी सुंदर कालाकुसर केलेले दागिनेच उठून दिसतात. या दागिन्यांमधील विविध रंगांचे सुंदर रत्न अशा कुशलतेने बसवलेले असतात की, ते बसवलेल्या कलाकाराचे कौतुक करावे तितके थिटेच! परंतु, आता याच कलेचं अत्यंत प्रगत शास्त्र तयार झालं असून दागिन्यांच्या निर्मितीत या शास्त्राने बरीच प्रगती केली आहे, हे बाजारात दिसणार्‍या खड्यांच्या असंख्य सुंदर डिझाइन्स पाहून कळतं. मुख्यत्वे दागिन्यात वापरण्यात येणार्‍या रत्नांचा अभ्यास म्हणजे जेमॉलॉजी आणि हे अभ्यास करणारे जेमॉलॉजिस्ट. हल्ली आपल्या देशात वाढणारी दागिन्यांची क्रेझ आणि ज्वेलरी डिझाइनमधील वाढता व्यापार पाहता जेमॉलॉजीला चांगले दिवस आले आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
कामाची पद्धत
दागिने बनवताना रत्नांचा प्रकार ओळखणं, त्यांच्या प्रमुख लक्षणांचा अभ्यास करणं आणि विविध प्रकारच्या प्रक्रिया करून त्याला अंतिम रूप देणं आदी कामं येतात. भारतीय ज्वेलरीच्या अधिकाधिक मागणीमुळे कित्येक परदेशी कंपन्या भारतीय जेमॉलॉजिस्टबरोबर काम करण्यास उत्सुक असतात.
पात्रता
जेमॉलॉजी करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर पोस्ट गॅ्रज्युएशन डिप्लोमा कोर्स करावा लागतो. जेम ग्राइंडर, पॉलिशिंगसारख्या शाखेत काम करण्यासाठी डायमंड प्रोसेसिंगचा डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उत्तम नजर, कलाकौशल्य, डिझाइन तयार करण्याचं ज्ञान, चांगली संवादक्षमता अशा मूलभूत गोष्टी या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतात.
कालावधी
जेमॉलॉजी नावाचा दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा तीन वर्षांचा डिग्री कोर्स उपलब्ध आहे. दोन वर्षांच्या मास्टर्स डिप्लोमात विविध विषय आहेत. डिग्रीसाठी अंदाजे १५,००० प्रतिवर्ष, तर मास्टर्ससाठी ३५,००० प्रतिवर्ष असा अंदाजे खर्च येतो.
काही प्रमुख संस्था
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्सटाइल, दादर
सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई
एस. एन. डी. टी. वूमेन्स युनिर्व्हसिटी कॅम्पस, सांताक्रूझ
जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबादेवी
श्री. भगुभाई मफतलाल इन्स्टिट्यूट, विलेपार्ले
ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, ताडदेव
व्यवसायाचे स्वरूप
यात तुम्ही एकदा शिक्षण घेतलं की, त्याचा स्वतंत्र व्यवसायही करू शकता. हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. इथे रत्न ओळखणं, पारखणं, कापणं, आकार देणं, पॉलिश करून चमकवणं, दागिन्यांत बसवणं अशा कित्येक जबाबदार्‍या काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतात. संशोधन, उत्पादन किंवा रचनाकार अशा आवडीच्या कुठल्याही एका भागाची जेमॉलॉजिस्टला निवड करावी लागते. अनेक प्रकारच्या रत्नांचा खरेखोटेपणा अचूक निवडता येणं आवश्यक असतं.
नोकरीच्या संधी
हल्ली फॅशन इंडस्ट्रीबरोबरच ज्वेलरी डिझाइन पर्यायाने जेमॉलॉजिस्टच्या संधी वाढत आहेत. जेमॉलॉजिस्टला परदेशी कंपन्यांकडून मागणी आहे.
मिळकत
कोर्स झाल्यानंतर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो किंवा सुरुवातीला ट्रेनी म्हणून कुठल्याही कंपनीत ६,००० ते १०,००० इतका पगार मिळतो. डिग्रीनंतर हाच पगार १५,०००च्या वर जातो. अनुभव आणि कुशलतेप्रमाणे तो वाढत जातो.

No comments:

Post a Comment