Wednesday, August 1, 2012

नातं जपा, नात जगा

आजचं एकविसावं शतक म्हणजे कॉम्प्युटरचं युग. हल्ली माणसं देखील कॉम्प्युटरप्रमाणे वागायला लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या या काळात नातेसंबंधातला ओलावा कमी होत चालला आहे अशी ओरड नेहमीच होत असते. हल्लीची पिढी नातेसंबंध वगैरे पार विसरून गेली आहे, असली वाक्ये तर कायम आपल्या कानावर आदळत असतात. मात्र, असं नाहीये. आजही नात्यांमधला ओलावा कायम आहे. उलट अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे ही वीण अधिकाधिक घट्ट होतेय्.
जुन्या परंपरावादी लोकांनी आपल्या विरुद्ध कितीही ओरड केली तरी आपली पिढी त्यांच्या या मावळत्या विरोधाला न जुमानता स्वत:च्या वेगळ्या वाटा धुंडाळण्यात गुंग असते. बरेचदा असं म्हटलं जातं की, आपल्या पिढीला नातीगोती जपता येतंच नाही. ज्येष्ठांचा आदर, भारतीय संस्कृती वगैरे गोष्टी आजच्या तरुण पिढीला माहितीच नाहीत. असे एक ना अनेक शाब्दिक वार आपल्यावर होत असतात. या मुद्यांचा विचार केल्यावर लक्षात येतं की, आपले ज्येष्ठ, वरिष्ठ जे काही म्हणतात ते थोड्या फार प्रमाणात बरोबर असेलही. पण त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही.
खरे तर आजची पिढी प्रत्येक नात्याला खूप जास्त महत्त्व देत असते. एखाद्या नात्याप्रति वाटणार्‍या भावना व्यक्त करण्यात देखील आजची पिढी मागे नाही. पूर्वीचे लोक मनातल्या भावना बोलायलाच किती तरी वर्ष लावायचे. मात्र, आजची पिढी मनातलं स्पष्टपणे मांडून नात्यांमधील पारदर्शकता वाढवीत आहे. आजच्या पिढीच्या मनात जे असतं तेच तोंडावर असतं. कदाचित जुने, रूढिवादी लोक याला चुकीचं ठरवीत दुषणं देतील. मात्र, मनात एक आणि तोंडावर दुसरंच काही तरी असं असण्यापेक्षा नात्यात स्पष्टता असलेली कधीही चांगली नाही का?
आपलेसे झालेले डे कल्चर
मित्रांनो, आज या सर्व गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे येत्या रविवारी येऊ घातलेला फ्रेंडशिप डे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हटला की, तरुणाईला वेध लागतात ते फ्रेंडशिप डेचे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून भारतात वेगवेगळ्या डेंनी पदार्पण केलं आणि पाहता-पाहता आपण या संस्कृतीला आपलंसं करून घेतलं. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे प्रमाणेच रोज डे, हग डे सारखे नवनवीन डे थाटात साजरे होऊ लागले. तसेही आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे. त्यामुळे या प्रकारच्या नवनवीन डेंचे भारतात स्वागत होणे स्वाभाविकच होते, असो. आपण साजरा करीत असलेल्या लहान-सहान गोष्टींतून आनंद कसा मिळवायचा हे खरे तर या जुन्या पिढीने आपल्या पिढीकडून शिकायला हवे. या डे कल्चरला काही जणांचा आक्षेप असला तरी, यातून चांगले काही मिळते, जगण्याचा नवीन आनंद मिळतो, नवीन उमेद मिळते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
नवा दृष्टिकोन आवश्यक
दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. डे कल्चरचा विचार सोडून एका नवीन दृष्टिकोनातून याला पाहण्याची गरज आहे. आज शिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी आपले शहर सोडून दुसर्‍या शहरात जातात. तिथे त्यांना सारेच अनोळखी असतात. दररोजचा जगण्याचा आनंदही त्यांच्यासाठी नवखाच असतो. अशावेळी त्यांना खर्‍या अर्थाने मदत होते ती मित्र-मैत्रिणींचीच. मित्रांची जागा त्या शहरात असलेले आपले नातेवाईकही घेऊ शकत नाहीत. हे नातंच वेगळं असतं. त्यामुळे अशांसाठी फ्रेंडशिप डे हा दिवस काही वेगळाच असतो. बाहेरगावी हॉस्टेलवर झालेली एखादी लहानशी ओळख जन्मभराच्या मैत्रीत परिवर्तित होऊन जाते. रूम पार्टनर म्हणून तीन वर्ष सोबत असलेला एखादा पार्टनर आपल्याला नातेवाईकांपेक्षाही जवळचा वाटायला लागतो.
नात्यातला आनंद लुटायला हवा
नातं हे कुठलही असो, त्या नात्यातला आनंद अनुभवता आला पाहिजे. तो वाटता आला पाहिजे. कुठलंही नातं फुलविण्यासाठी आवश्यक असतं ते नातं जगणं. जी व्यक्ती नातं जगू शकत नाही त्या व्यक्तीला नातं काय आहे हेच कळले नाही असे समजावे. आपली आजची पिढी प्रत्येक नात्याला सेलिब्रेट करू इच्छितेय्. यात चुकीचं असं काहीच नाही. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, वगैरे काही जणांसाठी शो ऑफ असतील. काही जण या गोष्टींची काय गरज आहे, ही आपली संस्कृती नव्हे असेही म्हणतील. पण या सर्वांना एक प्रश्‍न आवर्जून विचारावासा वाटतो की, केलं आपल्या भावनांचं, नात्यांचं सेलिब्रेशन तर काय बिघडलं? उलट या प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे नाती अधिक घट्ट होतात. त्या नात्यावर साचलेला जंग साफ होऊन चकाकी येते. आई-वडिलांप्रति आपल्या मनात असलेला आदर त्यांना एखादं गुलाब देऊन व्यक्त केला तर त्या चुकीचं काय आहे? बर्‍याच दिवसांपासून बोलायचं होतं पण नेमका क्षण येईना त्यासाठी असा एखादा दिवस निमित्त होत असेल तर अशा डे कल्चरला विरोध का म्हणून करायचा?
मैत्रीसारखे दुसरे नाते नाही
‘ज्याला आय नाय त्याला काय नाय...’ हे दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवतंय्? मैत्रीचं सुद्धा असंच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसेंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी मैत्रीसारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. आई असो की बाबा, ताई असो की दादा... प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-वडील आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालंय्. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवादही असतील. मात्र, यामुळे दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे. असं म्हणतात की, आपल्या हातून काही चूक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपिसाने हात फिरवणारी आई आणि ‘पुन्हा असं करू नकोस’ असं म्हणणारे बाबा आपल्याला सांभाळून घेतात. बरेचदा या आई-वडिलांची उणीव जिवाभावाचे मित्र भरून काढतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं... ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई-वडील रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा ‘मित्र’च असतो.
नेट थेट नाते
ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांमुळे आपण एकमेकांच्या फार जवळ आलोय्. सोशल नेटवर्किंगच्या जगात सर्वच आभासी आणि खोटं असतं, असं म्हटलं जात असलं तरीही या माध्यमातून होत असलेलं शेअरिंग फार महत्त्वाचं आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीची आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट येते, आपण ती स्वीकारतो. काही दिवासांतच आपलं रोज त्या अनोळखी व्यक्तीशी चॅटवर बोलणं सुरू होतं. हळूहळू आपण खुलू लागतो. रोज घडणार्‍या गोड, कडू, आंबट किस्स्यांचं शेअरिंग होऊ लागतं. कधी-कधी हे ऑनलाईन मित्र हळूच आपल्या मनाला स्पर्श करून जातात. असे ऑनलाईन नाते फसवे किंवा आभासी होऊच शकत नाही. यामुळे एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असलो तरी एकमेकांमधील अंतर कमी झालंय् हे नक्की. मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय् -
फेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे यामुळे आपण आपल्या नात्याला अधिक वृद्धिंगत करायला हवं. या प्रकारचे दिवस साजरे करणं कदापि वाईट नाही. मात्र, त्याला चंगळवादाची जोड देऊ नका. आपली वरिष्ठ मंडळी आपल्या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही, तर त्या सेलिब्रेशनच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात आहे. तेव्हा नाती जपा, नाती जगा. नात्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा संकल्प येत्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने करा.[वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]
निखिल भुते, नागपूर

मैत्रीतले नियम

मैत्री म्हणजे नवं नातं... हे नातं असं असतं की ते जपण्यासाठी आपण जिवाचीही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात तडजोड करावी लागते. पण ते खरंच टिकवायचं असेल, तर काही नियम आपल्या मनाशी घट्ट बाळगा आणि मग पाहा आपला मैत्रीचा प्रवास कसा फुलतो ते...
* मैत्री करताना कोणतेही भेदभाव पाळू नका.
* आपल्या मित्र-मैत्रिणींना कधीही त्यांची जात विचारू नका.
* मित्र मैत्रिणींचा वाढदिवस कधी विसरू नका.
* मैत्री करताना कोणतीही अट आपल्या मित्राला घालू नका.
* काही प्रसंगी तुम्ही मित्रासाठी काही तडजोड करत असाल, तर त्याच्या फुशारक्या चारचौघात किंवा कट्‌ट्यावर मारू नका.
* मित्रावर दडपण येईल असे कोणतेही काम त्याला सांगू नका.
* मैत्रीत व्यवहार नसलेलाच बरा आणि असा कधी व्यवहार करण्याची वेळच जर तुमच्यावर आली तर तो व्यवहार तंतोतंत पाळा.
* तुमची मैत्री एखाद्या मुलीशी झाली असेल तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
* मित्रांकडून आवाजवी अपेक्षा करू नका.
* मित्राच्या भिडेखातर कोणतेही व्यसन स्वतःला लागू देऊ नका. त्याने आग्रह केला तरी त्याला विनंती करून त्याचा आग्रह टाळा.
* आपल्या मित्र-मैत्रिणींना कमी लेखू नका.
मित्रांचीही कॅटॅगिरी करा.
* काही मित्र हे आपल्याला ओळखीपुरतेच बरे असतात.
* काही मित्रांना घरापर्यंत न्यावे. घरातल्यांची ओळख करून द्यावी.
* काही जणांशी सुसंवाद वाढवत त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती करून घ्या.
* काही जणांना आपली गुपितं सांगा, यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते.
* आपण सांगितले म्हणून आपल्या मित्राने त्याची गुपितंही आपल्याला सांगावीत हा आग्रह सोडा. अशाने संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
* मित्रांच्या स्वभावानुसार त्यांच्याशी संबंध वाढवा.
* मैत्रीच्या प्रवासात अनेक जण स्वार्थासाठी आपल्याशी मैत्री करत असतात. अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या मित्रांपासून दूर राहा.
* मित्रांशी गप्पा मारताना कधीही आपल्या कुटुंबीयांच्या ऐपतीचा उल्लेख अथवा आपण किती श्रीमंत आहोत याची जाणीव होऊ देऊ नका.
* तुमच्या मित्रांमधील चांगले गुण घेण्याचा प्रयत्न कराच, परंतु त्याच्यातील वाईट गुणांची त्याला जाणीव करून द्या. शक्यता असेल तर ते बदलण्यासाठी त्याला भाग पाडा.
* मैत्रिणींशी जवळीक करण्याचा प्रयत्न टाळा.
* मैत्रीचं नातं हे पवित्र असतं, असं केवळ म्हणू नका, आचरणात आणायचाही प्रयत्न करा.
* मित्रावर एखादे संकट कोसळले आहे, याची माहिती त्याने तुम्हाला आधी का कळवली नाही हा टेप वाजवण्यापेक्षा त्याला त्वरित कोणत्या प्रकारची मदत देणे शक्य आहे ते पाहा, आणि कामाला लागा.
* मुलींचा मित्र म्हटलं की घरातील मंडळींच्या कपाळावर आठ्या पडणे साहजिकच आहे, परंतु अशा प्रसंगी आपल्या मैत्रिणींच्या कुटुंबीयांची ओळख करून घेत त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा.
* शक्यतो कट्‌ट्यावर आपल्याच ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींचे अफेअर वगैरे आहे, या गप्पा करणे टाळा.
* काही प्रसंगी मुली कितीही बोल्ड असल्या तरी त्यांना नमते घेत तुम्ही दिलेल्या ऑफर्सला नकार देणे भाग पडते, अशा प्रसंगी त्यांना समजून घ्यायला शिका. त्यांच्याविषयी गैरसमज टाळा.
* मुलींनीही आपल्या मित्रासोबत मैत्री करताना काही प्रसंगी अंतर ठेवणेच चांगले असते.
* मैत्रीची ऑफर जर कोणी देत असेल, तर त्याचा त्यामागील दृष्टिकोन काय? त्याचा स्वभाव कसा आहे? याची खात्री झाल्याखेरीच मैत्रीसाठी हात पुढे करू नका.
* आपल्याला घरी जाण्यास उशीर जरी झाला तरी घरातील सर्वांना आपल्या प्रत्येक मित्राविषयी अथवा मैत्रिणींविषयी माहिती द्या.
* मैत्रीत कधीकधी आकर्षणही असतंच, अशा प्रसंगी स्वतःच्या मनाला सावरायला शिका.
* एखादा मित्र अथवा मैत्रीण आवडायला लागली तर त्यांचा तेवढा आदर करून त्यांना हे स्पष्टपणे सांगा. त्याने अथवा तिने घेतलेल्या निर्णयाचा आदरही करा.
* मी तुला केवळ मित्र मानतो, बाकी काही नाही, असा पाढा नेहमीच वाचणे मैत्रीसाठी घातक ठरू शकते.
* एखाद्या विषयी मित्र अथवा मैत्रीण करण्याची ओढ असली तरी त्याच्या मर्जी शिवाय मैत्रीचा अट्टहास धरू नका.
असे अनेक नियम आपण मैत्री करताना पाळावेत. यातूनच आपल्याला एक सच्चा दोस्त मिळू शकतो. मैत्री हे असे एक रसायन आहे की ज्यात आपण कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो. उदाहरण द्यायचेच झाले तर आपण मैत्रिणीला किंवा मित्राला आपली गुपितं सांगितली की आपली मैत्री अधिक घट्ट होतेच शिवाय त्याचा रंगही पक्का होतो. असे केल्यावर पाहा आपल्या मैत्रीचा प्रवास किती सुखकर होतो ते. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

नव्या वाटा

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे करीअरच्या सर्वच वाटा संपल्या असं होत नाही. फेरपरीक्षा देईपयर्र्ंत इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत, जे पुढील वाटचालीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरू शकतात.
दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेरपरीक्षेचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय ठरवण्यासाठी अद्याप शिक्षण मंडळाच्या बैठका सुरू आहेत. यामुळे ठरावीक विषयांमध्येच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. एका परीक्षेत अनुत्तीर्ण झालो म्हणजे करीअरच्या सर्वच वाटा संपल्या असं होत नाही. फेरपरीक्षा देईपयर्र्ंत इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत, जे पुढील वाटचालीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरू शकतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, आयटीआय आदी संस्थांमधून माफक शुल्क आकारून विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं.
परीक्षा कोणतीही असो, त्यामध्ये अनुत्तीर्ण होण्यामागे अभ्यास न करणं हे एकच कारण असू शकतं, असं नाही. प्रतिकूल परिस्थितीही त्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नापास झालो म्हणजे आयुष्याचं गणितच चुकलं, असं नाही. याबाबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. एन. आर. शिंदे सांगतात, नापास झाल्यानं मनावर ताण नक्कीच येतो. पण तो दूर करण्यासाठी ज्ञानाची वाट चोखाळणं आवश्यक असतं. अभ्यासाची, ज्ञानार्जनाची कवाडं आपल्यासाठी कधीच बंद होत नाहीत. घरी बसून केवळ, असं कसं झालं, काय करावं याचा विचार करीत कपाळावर आठ्या आणि गालाला हात लावून बसण्यापेक्षा ज्ञानार्जनाच्या दिशेनं पुन्हा आत्मविश्वासानं उचललेलं पाऊल आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पाहता आपलं वर्ष वाया गेलं, असा विचारही विद्यार्थ्यांच्या मनात डोकावणार नाही.
आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेणं कठीण जातं, अशा विद्यार्थ्यांसाठी आयटीआयमध्येही अल्पकालावधीचे अभ्यासक्रम आहेत. दहावीत नापास झाल्यानं निराश होण्याचं काहीच कारण नाही. ऑक्टोबर वा मार्चमध्ये आपण पुन्हा परीक्षा देऊ शकतोच, पण तोपर्यंतच्या मधल्या कालावधीत अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही पूर्ण करता येतात. हे अभ्यासक्रम रोजगार मिळवून देण्यासाठीही मदत करतात.
आयटीआय संस्थेतील अभ्यासक्रम (मुलींसाठी)
* इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
कालावधी - २ वर्षे
पात्रता - एस.एस.सी.
* इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टिम मेन्टेनन्स
कालावधी - २ वर्षे
पात्रता - एस.एस.सी.
* फॅशन डिझायनिंग ऍण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग
कालावधी - २ वर्षे
पात्रता - एस.एस.सी.
* ड्रेस मेकिंग
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एस.एस.सी
*हेअर ऍण्ड स्कीन केअर
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एस.एस.सी
*फ्रुट्‌स ऍण्ड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एस.एस.सी
* इंटेरिअर डेकोरेशन आणि डिझाईन
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एस.एस.सी
* सेक्रेटरिअल प्रॅक्टिस
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एच.एस.सी
* कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग
कालावधी - १ वर्ष
पात्रता - एच.एस.सी
* रंगारी (जनरल)
कालावधी - २ वर्षे
पात्रता - ८ वी उत्तीर्ण
* वायरमन, पेंटर, ऍग्रिकल्चर मेकॅनिक
कालावधी : २ वर्षे
* कटिंग-सिविंग, एम्ब्रॉयडरी, लेदर वर्क, क्रफ्टस्‌मन, बांबू वर्क, विव्हिंग-वुल फॅब्रिक, कारपेंटरी, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, प्लम्बर, मेटल वर्क, जनरल फिटर कम मेकॅनिक, कॅबिनेट फर्निचर मेकिंग
कालावधी : १ वर्ष
* डी.टी.पी
कालावधी : ६ महिने
पात्रता - नववी पास
*सर्टिफिकेट इन प्रोग्रॅमिंग
कालावधी : ६ महिने
पात्रता - संगणकाचे ज्ञान आवश्यक
* आरोग्यमित्र
कालावधी : ६ महिने
पात्रता - सातवी पास
* कॉम्प्युटर ऑपरेशन
कालावधी - ६ महिने
पात्रता - नववी पास
* रुग्ण-साहाय्यक
कालावधी - १ वर्ष
पात्रता - दहावी पास-नापास, सातवी पास
* गृह रुग्ण-साहाय्यक
पात्रता - सातवी पास
कालावधी - ३ महिने
* योगशिक्षक पदविका
कालावधी - १ वर्ष
पात्रता - दहावी पास
* शास्त्रीय मसाज थेरपी प्रमाणपत्र
कालावधी - ६ महिने
पात्रता - सातवी पास
* माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम
कालावधी - १ वर्षे
पात्रता - दहावी पास/नापास

गुगल डुडल

गुगलने संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त एक मनोरंजक आणि विचार करायला लावणारा डुडल तयार केला आहे.
गुगल आपल्या प्रत्येक डुडलमध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो. यावेळीही गुगलने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. गुगलने आपल्या डुडलमध्ये सहा टास्क दिले आहेत. जसजसे तुम्ही प्रत्येक टास्क यशस्वीपणे पूर्ण करत जाल तसतसे ॠेेसश्रश या इंग्रजी अक्षरामधील प्रत्येक शब्दामध्ये रंग भरले जातात.
गणिततज्ज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांचा जन्म २३ जून १९१२ रोजी लंडन शहरात झाला. भारतातील ब्रिटिश राजवटीत ऍलन यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. डिजिटल संगणकावर सर्वप्रथम काम करणार्‍यामध्ये एलन यांचा समावेश होतो. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीचे संकेतलिपीतील संदेश ‘डिकोड’कामी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. यासाठी त्यांनी कोलॉसस नावाचा संगणक बनवला होता. महायुद्धानंतर ते राष्ट्रीय प्रयोगशाळेत दाखल झाले.
संगणकाचा विकास आणि रसायनशास्त्रातील काही नव्या संकल्पना जीवशास्त्रात वापर करण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. १९५० मध्ये एलन यांनी यंत्रांची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी ट्यूरिंग टेस्ट घेतली होती. १९५४ मध्ये त्यांनी सायनाइडमिश्रित सफरचंद खाऊन आत्महत्या केली.
१९५२ साली त्यांनी समलैंगिक संबंध ठेवल्याचे मान्यदेखील केले होते. समलैंगिकता त्याकाळी इंग्लंडमध्ये गुन्हा मानला जात होता. न्यायालयात एलन यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला. एलन यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
२००९ मध्ये इंग्लंडच्या पंतप्रधानांनी एलन यांच्यावर त्याकाळी झालेल्या अत्याचाराबद्दल शोक प्रकट केला होता. एलेन ट्यूरिंग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘ट्यूरिंग अवॉर्ड’ हा संगणक विज्ञानामधील नोबेल समजला जातो. गुगल आणि इंटेल हे या पुरस्काराचे प्रायोजक आहेत.

पाऊस काही रुपे काही रंग

पाऊस... माणसांचा सखा, धरतीचा मित्र. पाऊस म्हणजे निसर्गाची सृजनशील प्रतिभा. पाऊस म्हणजे निसर्गाची उत्कट कविता. पाऊस म्हणजे सृजनशीलतेची अक्षय ऊर्जा. पाऊस म्हणजे नवनिर्माणाचा सोहळा!
* * * *
पाऊस म्हणजे आई. पाऊस म्हणजे सदासर्वदा समता देणारे मातृहृदय. पाऊस म्हणजे साक्षात वात्सल्य. पाऊस म्हणजे करुणा. मायेच्या नात्यांचा शब्दातीत गोतावळा म्हणजे पाऊस. शब्दांत न मावणार्‍या आभाळभर भावना म्हणजे पाऊस. अगणित धारांनी कोसळणारा पाऊस म्हणजे वात्सल्याचा, प्रेमाचा कल्लोळ!
* * * *
पाऊस म्हणजे ओहोटी नसणारी अपार प्रीती, पाऊस म्हणजे न आटणारी भक्ती. मनामनांची बेरीज करणारी सृजनवेळा म्हणजे पाऊस. अनामिक आर्ततेनंतरची तृष्णातृप्ती म्हणजे पाऊस.
* * * *
पाऊस म्हणजे गावाच्या जगण्याला श्‍वासांचे आंदण. पाऊस म्हणजे कोरड्या तलावांच्या पदरातला थेंबांचा जोगवा. पाऊस म्हणजे लोकसरितेला आभाळाचे जीवनदान. पाऊस म्हणजे शेतांना, जंगलांना दिलेला हिरवाईचा स्वाभिमान. धरतीच्या अंगाला अंकुरांची हिरवीगर्द पिसे येणे म्हणजे पावसाचे येणे!
* * * *
पाऊस म्हणजे निरागसांच्या ओठावरचे बडबडगीत. रस्त्याच्या कडेला वाहणार्‍या ओहोळांमध्ये चिमुकली नाव सोडण्याचा महोत्सव म्हणजे पाऊस. पोरासोरांच्या भिजण्याचे खरे नाव पाऊस. शाळेभोवतीच्या तळात मुलांचे मनसोक्त धावणे आणि आकाशात ढगांचे धावणे जेव्हा एकाच वेळी सुरू असते तेव्हा पाऊस बालगीतांचा मल्हार आळवतो. पाऊस म्हणजे मूर्तिमंत बालपण.
* * * *
पाऊस म्हणजे फक्त उत्कट आनंदच असतो का? कधी पाऊस बेसुमार बरसतो, तेव्हा तो निर्दयी वाटतो, पाऊस म्हणजे दु:खाचा ऋतू वाटतो. नदी तीरावरचा गाव रात्रभर रडतो अन् फूल तोडावे तसा नदीचा पूर एखादा जीव खुडून नेतो. पिकांच्या माना मुरगाळतात. घराच्या छपराला आधार देणारे भिंतीचे हात निखळतात. घराचे-बापाचे हृदय गहिवरते. आईचा पदर मुलांच्या जिवासाठी किल्ल्याचा परकोट होतो. नदी जेव्हा वस्तीतील प्रत्येकाच्या घरी पाहुणी जाते, तेव्हा सारेच धान्य आंदण म्हणून घेऊन जाते. चिमणीलाही टाकायला जेव्हा घरात दाणे नसतात, तेव्हा घरातले चिमणे जीव गहिवरल्या गळ्याने भुकेची भैरवी गातात. अशा वेळी पाऊस सखा नसतो, पाऊस असतो जन्माचा वैरी; मरण देत नाही अन् जगणे हिरावल्याशिवाय राहात नाही. पाऊस म्हणजे आभाळभर दु:ख, पाऊस म्हणजे फक्त रडणे. बेसुमार पाऊस आभाळातून अश्रूंचे खलिते पाठवतो. बेसुमार पाऊस गावाला युद्धकैद्यांचे मरण नावाचे जगणे देतो. माणसांचा कणाही मोडून टाकतो अनेकदा क्रूर पाऊस!
* * * *
फूटपाथवरच्या पावसाला मनच नसते. भीक मागणार्‍या पोरांच्या उघड्या अंगांची पावसाला तमा नसते. औषधाविना रस्त्याच्या कडेला तळमळून मरणार्‍यांनाही पाऊस जीव जातपर्यंत छळल्याशिवाय राहात नाही. स्मशानात जळणार्‍या प्रेतांवरही पावसाची वक्रदृष्टी पडल्याशिवाय राहात नाही. गटारातले पाणी जेव्हा फूटपाथवर येते, तेव्हा माणसे मुंग्यांसारखी आश्रय शोधतात. फूटपाथवरची पावसाळी रात्र म्हणजे प्रेताजवळ जागण्याची रात्र असते. अन्नाला पारख्या असणार्‍या दिवसाची भुकेली रात्र म्हणजे फूटपाथवरचा पाऊस! फूटपाथवरच्या आणि महानगरीय झोपडपट्ट्यांमधल्या माणसांसाठी पाऊस दयाघना कधीच नसतो. पावसाची झड रोजगार बुडवते, झोपड्यांच्या गर्दीत पाणी तुंबते, चहूकडे पाणी पण पिण्याला थेंब नाही, असे घडते, तेव्हा ढगांतून पाऊस नव्हे, दु:ख, वेदना, अश्रू, समस्या, दारिद्र्य बरसते.
पावसाशी आपले शब्दात न मावणारे नाते असते. सर्वस्व हिरावून नेणारा, जन्माचा वैरी अशीही रूपे असली तरी पाऊस हवाहवासा वाटतो. पाऊस गद्दार असतो, पाऊस दगाफटका करतो, एकदा भेटून अंगभर खेटून पुन्हा न भेटणारा प्रियकर असाही पाऊस असतो आणि वेड्या आशा पल्लवीत करून न येणारा दुष्काळाचे दुष्कृत्य करणाराही पाऊसच असतो; पण तरीही पावसावरची प्रीत ढळत नाही; पाऊस नको असे मन म्हणत नाही. आभाळ थेंबाथेंबांनी जेव्हा धरणीला भेटते, तेव्हा थेंबाएवढे मन ढगाएवढे होते. मातीचा सुवास जेव्हा आभाळाला जडतो, पाऊस तेव्हा प्रत्येकाच्या मनात दरवळतो. पावसाचा स्पर्श मायेचा स्पर्श असतो. पावसाचा स्पर्श मातीच्या सृजनशील अस्तित्वाचा स्पर्श असतो. पाऊस म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी देण्याच्या समर्पणशीलतेचा उत्कट संस्कार! पाऊस रुसला तरी त्याच्यावरचे प्रेम कमी होत नाही, उलट वाढते. अन् पाऊस बेसुमार बरसला; दु:खाला पारावार नसणारा पूर आला तरी आता कधीच पाऊस नको; असे म्हणता येत नाही. पावसावर मानवाचं अखंड आणि अथांग प्रेम आहे. पाऊस चिडवतो, रडवतो, कधी आयुष्यातून उठवतो, कधी जिवंतपणीच मरणाचाही अनुभव देतो, पण चिवटपणे जगणे शिकवतो. जगण्यावर शतदा प्रेम करण्याची उदंड ऊर्जा पाऊस देतो. पावसाला त्याच्या सर्व दोषांसह स्वीकारता येत नाही आणि त्याच्या सर्व गुणांसह नाकारताही येत नाही. स्वीकारल्यावर आपला म्हणता येत नाही आणि नाकारल्यावर परका म्हणता येत नाही. पावसाचे प्रत्येकाशी शब्दांच्या, भावनांच्या पलीकडचे नाते आहे. पाऊस नावाच्या निसर्गाच्या एका रूपाचे माणसांशी हळवे अनुबंध आहेत. हे अनुबंध शब्दात गुंफले, त्याचे रंग, त्याची रूपे कितीही आळवली, तरी त्यातले नवेपण संपत नाही. पाऊस असा वेगळा आणि विरळा असतो.
प्रा. अजय देशपांडे, ९८५०५९३०३०

कर्मचारी निवड आयोगाची स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परीक्षा....
कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध संधी आणि जागांचा तपशील :- या निवड स्पर्धेच्या केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व कनिष्ठ लिपीक स्तरावरील उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, उपलब्ध जागांची संख्या व तपशील नंतर जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता :- अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे
वयोमर्यादा :- २६ वर्षे. राखीव गटांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया :- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा निर्धारित परीक्षा केंद्रावर २१ व २८ ऑक्टोबर २०१२ रोजी घेण्यात येईल. त्या मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश करण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविण्याचा उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क :- अर्जासह भरावयाचे शुल्क १०० रुपये असून, विहित नमुन्यात अर्ज करणार्‍या उमेदवारांनी ते निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणार्‍या सेंट्रल रिक्रुटमेंट स्टँप स्वरूपात तर संगणकीय पद्धतीने अर्ज करणार्‍यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील :- अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० जुलै २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर तर महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे आपले अर्ज क्षेत्रिय निदेशक (पश्‍चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठवावित. शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१२.
बारावी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान असणार्‍या ज्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या सेवेत आपले करीअर सुरू करायचे असेल अशांनी या स्पर्धा परीक्षा संधीचा लाभ घ्यावा.
द. वा. आंबुलकर

चकाकते करीअर : एक्स्ट्रा डिग्री

उत्तम नजर, कलाकौशल्याचं उत्तम ज्ञान, चांगली संवादक्षमता याचबरोबर रत्नांची अचूक पारख, त्यावर तासन्‌तास काम करण्याची आवड असेल तर तुम्ही रत्नपारखी म्हणून करीअर करू शकता. फॅशन इंडस्ट्री बरोबरच ज्वेलरीची क्रेझ वाढल्याने जेमॉलॉजिस्टच्या संधी उपलब्ध आहेत.
दागिने म्हणजे स्त्रियांचा आवडता विषय. कुठल्याही समारंभावेळी सुंदर कालाकुसर केलेले दागिनेच उठून दिसतात. या दागिन्यांमधील विविध रंगांचे सुंदर रत्न अशा कुशलतेने बसवलेले असतात की, ते बसवलेल्या कलाकाराचे कौतुक करावे तितके थिटेच! परंतु, आता याच कलेचं अत्यंत प्रगत शास्त्र तयार झालं असून दागिन्यांच्या निर्मितीत या शास्त्राने बरीच प्रगती केली आहे, हे बाजारात दिसणार्‍या खड्यांच्या असंख्य सुंदर डिझाइन्स पाहून कळतं. मुख्यत्वे दागिन्यात वापरण्यात येणार्‍या रत्नांचा अभ्यास म्हणजे जेमॉलॉजी आणि हे अभ्यास करणारे जेमॉलॉजिस्ट. हल्ली आपल्या देशात वाढणारी दागिन्यांची क्रेझ आणि ज्वेलरी डिझाइनमधील वाढता व्यापार पाहता जेमॉलॉजीला चांगले दिवस आले आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
कामाची पद्धत
दागिने बनवताना रत्नांचा प्रकार ओळखणं, त्यांच्या प्रमुख लक्षणांचा अभ्यास करणं आणि विविध प्रकारच्या प्रक्रिया करून त्याला अंतिम रूप देणं आदी कामं येतात. भारतीय ज्वेलरीच्या अधिकाधिक मागणीमुळे कित्येक परदेशी कंपन्या भारतीय जेमॉलॉजिस्टबरोबर काम करण्यास उत्सुक असतात.
पात्रता
जेमॉलॉजी करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर पोस्ट गॅ्रज्युएशन डिप्लोमा कोर्स करावा लागतो. जेम ग्राइंडर, पॉलिशिंगसारख्या शाखेत काम करण्यासाठी डायमंड प्रोसेसिंगचा डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उत्तम नजर, कलाकौशल्य, डिझाइन तयार करण्याचं ज्ञान, चांगली संवादक्षमता अशा मूलभूत गोष्टी या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतात.
कालावधी
जेमॉलॉजी नावाचा दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा तीन वर्षांचा डिग्री कोर्स उपलब्ध आहे. दोन वर्षांच्या मास्टर्स डिप्लोमात विविध विषय आहेत. डिग्रीसाठी अंदाजे १५,००० प्रतिवर्ष, तर मास्टर्ससाठी ३५,००० प्रतिवर्ष असा अंदाजे खर्च येतो.
काही प्रमुख संस्था
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्सटाइल, दादर
सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई
एस. एन. डी. टी. वूमेन्स युनिर्व्हसिटी कॅम्पस, सांताक्रूझ
जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबादेवी
श्री. भगुभाई मफतलाल इन्स्टिट्यूट, विलेपार्ले
ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, ताडदेव
व्यवसायाचे स्वरूप
यात तुम्ही एकदा शिक्षण घेतलं की, त्याचा स्वतंत्र व्यवसायही करू शकता. हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. इथे रत्न ओळखणं, पारखणं, कापणं, आकार देणं, पॉलिश करून चमकवणं, दागिन्यांत बसवणं अशा कित्येक जबाबदार्‍या काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतात. संशोधन, उत्पादन किंवा रचनाकार अशा आवडीच्या कुठल्याही एका भागाची जेमॉलॉजिस्टला निवड करावी लागते. अनेक प्रकारच्या रत्नांचा खरेखोटेपणा अचूक निवडता येणं आवश्यक असतं.
नोकरीच्या संधी
हल्ली फॅशन इंडस्ट्रीबरोबरच ज्वेलरी डिझाइन पर्यायाने जेमॉलॉजिस्टच्या संधी वाढत आहेत. जेमॉलॉजिस्टला परदेशी कंपन्यांकडून मागणी आहे.
मिळकत
कोर्स झाल्यानंतर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो किंवा सुरुवातीला ट्रेनी म्हणून कुठल्याही कंपनीत ६,००० ते १०,००० इतका पगार मिळतो. डिग्रीनंतर हाच पगार १५,०००च्या वर जातो. अनुभव आणि कुशलतेप्रमाणे तो वाढत जातो.