Thursday, May 17, 2012

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे सुनील प्रभू्


       मुंबई, (९ मार्च) - मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून शिवसेनेचे सुनील प्रभू्र आणि भाजपाचे मोहन मिठबावकर यांनी दणदणीत विजय मिळविला. सुनील प्रभू्र यांना १२५ मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील कॉंगे्रसच्या सुनील मोरे यांना अवघ्या ६५ मतांवर समाधान मानावे लागले. पालिकेत नव्याने निवडून आलेल्या १५ अपक्ष नगरसेवकांनी महायुतीच्या पारड्यात आपली मते टाकून ‘जिंकून’ दाखविण्याची संधी महायुतीला दिली.
    सलग चौथ्यांदा मुंबई महापालिकेची सत्ता भाजपा आणि रिपाईला सोबत घेत शिवसेनेने काबीज केली. २२७ सदस्य संख्यांपैकी सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीला ११४ मतांची गरज होती. यापैकी शिवसेनेचे ७५, भाजपाचे ३१ आणि रिपाईचे १ असे एकूण १०७ मते महायुतीची होती. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अवघ्या ७ मतांची गरज असताना गेल्यावेळी महायुतीसोबत असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी आणि गीता गवळी यांनी यावेळीही महायुतीला पाठिंबा दिला. तर भाजपासोबत १ आणि शिवसेनेला ९ अपक्ष सदस्यांनी पाठिंबा दिल्याने महायुतीकडे १२० मते होती. परंतु आजच्या निर्णायक क्षणी उरलेल्या ५ अपक्षांनीही महायुतीच्या बाजुने मतदान केले.
    ही निवडणूक प्रक्रिया पार पाहण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, प्रवक्त्या आ. डॉ. निलम गोर्‍हे, आ, विनोद घोसाळकर, विभागप्रमुख ऍड. अनिल घोसाळकर, सचिव आदेश बांदेकर, युवासेना प्रवक्ते आ. कॅप्टन अभिजीत अडसूळ, भाजपा आ. गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.
    आजच्या मतदान प्रक्रियेत २२७ पैकी १९० सदस्यांनी सहभाग घेतला होता. मनसेचे सदस्य पालिका मुख्यालयात हजर होते. पण त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. तर, सपाच्या ९ नगरसेवकांनी सभागृहात उपस्थिती दाखविली परंतु मतदानाच्यावेळी तटस्थ भूमिका घेतली. महापौरपदाच्या निवडणूकीत सुनील प्रभू यांना १२५ मते मिळाली तर उपमहापौरपदाच्या निवडणूकीत मोहन मिठबावकर यांना १२२ मते मिळाली. भारिपचे एक सदस्य यावेळी गैरहजर राहिले होते तर दोन सदस्यांनी चुकीच्या ठिकाणी सही केल्याने त्यांचे मते बाद ठरविण्यात आली. घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १२२ मधून मनसे उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन विजयी झालेले दीपक हांडे यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपले मत महायुतीच्या बाजूने दिले.

No comments:

Post a Comment