Friday, March 9, 2012

पर्रिकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी, दि. ९ (वृत्तसंस्था) - भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकर यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायण यांच्याकडून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
गोव्याच्या नेतृत्वाची धुरा तिसर्‍यांदा स्वीकारणार्‍या पर्रिकरांसोबत अन्य सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेणार्‍यांत अल्पसंख्य समाजाचे आमदार फ्रान्सीस डिसोजा, माथानी साल्ढाणा, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पारसेकर, रमेश तावडकर, दयानंद मांद्रेकर आणि मगोपचे रामकृष्ण ढवळीकर यांचाही समावेश होता. गोव्यात भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. यात युतीने सभागृहात पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे.

No comments:

Post a Comment