Tuesday, March 13, 2012

गोव्याची राजकीय स्थिरतेच्या दिशेने वाटचाल!

भाजपा आणि मित्रपक्षांना २८ जागा मिळत असताना कॉंग्रेसला दहाचा आकडाही गाठता आला नाही, ही गोष्ट अभूतपूर्वच म्हणावी लागेल. कॉंग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर आपले खातेही खोलता आले नाही. यावरून गोवेकर मतदारांमध्ये कॉंग्रेसबाबत किती प्रचंड नाराजी होती, याची कल्पना येते.
-----------------
महाराष्ट्राच्या शेजारील गोव्यामध्ये प्रचंड विजय मिळवून भाजपाने तेथील कॉंग्रेसचे घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणले आहे. ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपाला २१, सहयोगी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ जागा मिळाल्या असून भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवलेले दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्याशिवाय गोवा विकास पार्टीच्या विजयी झालेल्या दोन आमदारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपाला २८ आमदारांचे पाठबळ लाभणार आहे. त्यामुळे गेली काही वर्षे गोव्यामध्ये अनुभवायला मिळालेली राजकीय अस्थिरता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत इतक्या मोठ्या बहुमताने गोवेकरांनी एखाद्या पक्षाला पहिल्यांदाच निवडून दिले आहे. एवढे मोठे बहुमत मिळाल्यामुळे भाजपा सरकारला आपले धोरण बिनधास्तपणे राबवता येणार आहे.
गेल्या काही वर्षांत गोव्यामध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. १९९६ पासून गेल्या सोळा वर्षांत गोवेकरांनी चौदा सरकारे अनुभवली. गोवेकरांनी याच काळात अनेक मुख्यमंत्री अनुभवले. गेल्या काही निवडणुकांमध्ये गोवेकरांनी कोणत्याही पक्षाला सुरक्षित असे बहुमत मिळवून न दिल्याने गोव्यामध्ये राजकीय अस्थिरता अनुभवायला हा गोव्याचा स्थायीभाव बनला होता. मात्र याखेपेस भाजपाला स्पष्ट बहुमत प्रदान करून गोवेकरांनी तेथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्याचे बहुमोल काम केले आहे.
भाजपा आणि मित्रपक्षांना २८ जागा मिळत असताना कॉंग्रेसला दहाचा आकडाही गाठता आला नाही, ही गोष्ट अभूतपूर्वच म्हणावी लागेल. कॉंग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर आपले खातेही खोलता आले नाही. यावरून गोवेकर मतदारांमध्ये कॉंग्रेसबाबत किती प्रचंड नाराजी होती, याची कल्पना येते. कॉंग्रेसने बर्‍याच चुका केल्या. सर्वात मोठी चूक म्हणजे कॉंग्रेसला स्वतःबद्दल वाटणारा फाजील आत्मविश्वास ही होती. आपल्याला बहुमताच्या आकड्याच्या आसपास पोहोचता येईल, अशी खात्री कॉंग्रेसला वाटत होती. त्या दृष्टीने निवडून येण्याची शक्यता असलेल्या काही अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने निवडणुकीचे निकाल लागण्याअगोदरच सुरू केले होते. कॉंग्रेसने तिकीट वाटप करताना घराणेशाहीचे जे राजकारण केले ते गोवेकर मतदारांनी पूर्णपणे उधळून लावले. बड्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट वाटपात प्राधान्य देण्याचा कॉंग्रेसचा निर्णय कॉंग्रेसला अतिशय महागात पडला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या घरातील चौघांना उमेदवारी देण्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय सामान्य कार्यकर्त्यावर अतिशय अन्याय करणारा होता. यातील तिघांना कॉंग्रेसने तर एकाला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. चर्चिल आलेमाव यांच्यासकट त्यांच्या घरातील इतर तिघांचा पराभव करून गोवेकर मतदारांनी कॉंग्रेसचे हे घराणेशाहीचे राजकारण आपण खपवून घेणार नाही, हे मतपेटीद्वारे दाखवून दिले. निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाली होती. यावरून कॉंग्रेसला स्वतःबद्दल वाटणार्‍या फाजील आत्मविश्वासाची कल्पना यावी. अँटी इन्क्युंबन्सी फॅक्टर कॉंग्रेसच्या विरोधात जोरदारपणे काम करत होता. निवडणुकीत ८० टक्क्यांवर मतदान झाल्यानंतर खरे तर कॉंग्रेसचे भवितव्य तेथेच ठरून गेले होते. एवढ्या मोठ्या संख्येने गोवेकर, मतदानासाठी उतरले याचाच अर्थ कॉंग्रेसबद्दल त्यांच्या मनात जी नाराजी होती ती मतपेटीद्वारे त्यांना व्यक्त करायची होती, हाच होता. कॉंग्रेसला गोवेकर मतदारांनी दहाचा आकडाही गाठू दिला नाही, यावरून कॉंग्रेस सरकारबद्दल त्यांच्या मनात किती प्रचंड असंतोष होता ही गोष्ट लक्षात यावी.
कॉंग्रेसच्या दारुण पराभवाचे सर्वात मोठे कारण होते खाणकाम घोटाळा. या खाणकाम घोटाळ्याची चौकशी करणार्‍या पब्लिक अकाऊंट्स कमिटीचे अध्यक्ष होते विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर. मनोहर पर्रिकर यांनी त्या संबंधात सादर केलेला अहवाल विधानसभेत मांडण्यास विधानसभेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी अनुमती दिली नव्हती. गोवा विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळवल्यानंतर भाजपा नेते मनोहर पर्रिकर यांनी तो अहवाल आपण लोकायुक्तांना सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. बेकायदेशीर खाणकामामुळे गोवा सरकारच्या तिजोरीला जवळपास दहा हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे अनुमान सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरण गेले कित्येक दिवस गोव्यातील प्रसिद्धीमाध्यमांमधून गाजत होते. त्याचा फटका विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला बसणार याबाबत कोणाचेच दुमत नव्हते. खाणकाम घोटाळा, भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण या आरोपांमुळे गोव्यातील कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला असताना विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सामना करायचा होता तो भाजपाचे नेते मनोहर पर्रिकर यांच्याशी. स्वच्छ प्रतिमा असलेले आणि उच्च शिक्षित मनोहर पर्रिकर हे गोव्याची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवू शकतील, असा विश्‍वास गोव्यातील जनतेला वाटला असावा म्हणूनच गोव्यातील जनतेने भाजपाला भरघोस पाठिंबा दिला असावा. भाजपाने या निवडणुकीत पूर्वीच्या आपल्या काही चुका सुधारण्याचा जाणीवपूर्वक  प्रयत्न केला. गोव्यात मोठ्या संख्येने असलेल्या ख्रिश्‍चन समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाने ख्रिश्चन समाजातील सात जणांना उमेदवारी देऊ केली. त्याचा चांगला परिणाम निवडणुकीत  पाहायला मिळाला. ख्रिश्चन समाजाची मते मोठ्या प्रमाणात भाजपाला मिळाल्याने भाजपाची कामगिरी पूर्वीपेक्षा किती तरी चांगली होऊ शकली. ख्रिश्चन समाजाबरोबरच मुस्लिम समाजाची मतेही लक्षणीयरीत्या भाजपाला मिळाल्याचे स्वतः मनोहर पर्रिकर यांनीच जाहीर केले आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले मनोहर पर्रिकर हे गोव्याचा विकास ठामपणे करू शकतील, असा विश्वास गोवेकरांना वाटला असावा, म्हणूनच त्यांनी भाजपा आणि मित्रपक्षांना भरभरून मतदान केले असावे. मनोहर पर्रिकरांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेताना विकासाच्या मुद्द्यावर जोर दिला होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. भाजपाबरोबर युती करण्याचा मगोपचा निर्णय मगोप आणि भाजपा या दोघांसाठी लाभदायक ठरला. मगोपने या निवडणुकीत गेल्या खेपेपेक्षा एक जागा जास्त मिळवली तर भाजपाने गेल्या खेपेपेक्षा ७ जागा जास्त मिळवल्या. गोव्यातील मतदारांनी भाजपावर जो भरभरून विश्वास दाखवला आहे त्यामुळे भाजपाची जबाबदारी बरीच वाढली आहे. अर्थात गोवेकरांनी भाजपाला मोठे बहुमत मिळवून दिल्याने भाजपा सकारला आपली धोरणे व्यवस्थितपणे राबवणे सहजपणे शक्य होणार आहे.            
--
अभय गोखले, विश्व संवाद केंद्र. 
तरुण भारत, आसमंत, सोलापूर दि. ११ मार्च २०१२ 

No comments:

Post a Comment